बंगलोर कँट रेल्वे स्थानकावरील हारांच्या या स्वागतभेटीत ह्या नाडी पट्टीचे पॅकेट मला मिळाले 
कार्यक्रम संपल्यावर यावर्षी जे घडले ते विलक्षण म्हणावे लागेल.
त्याचे असे  झाले की पिंपरी-चिंचवड भागातील श्री केबल टीव्हीवर या  कार्यक्रमाचा भाग वेळोवेळी दाखवला जातो. ते आपली टीम घेऊन दरवेळी हजर असतात तसे ते यावेळी ही आले होते. सर्व लोक पांगल्यावर आम्ही काही जण गप्पा  मारत होतो. त्यावेळी मला अचानक आठवले की नुकतीच मी दक्षिण भारताची सफर संपवून परतताना  बंगलोरच्या भेटीत विंग कमांडर राकेश नंदानी मला एक ताड़पत्रावरील लिखाणाचे  पॅकेट नाडीग्रंथांचा अभ्यास करायला मदत म्हणून आवर्जून हाती दिले होते. पट्टया नाडी  ग्रंथांच्याच आहेत की आणखी  कशाच्या त्याचा शोध घ्यावा व कळवावे. असे त्याने मला ते सुपूर्त करताना म्हटले होते. 
घरून निघताना मी लक्षात ठेऊन त्या पॅकेटमधील पट्ट्यांना ओवलेली  नाडी सोडवून त्यातली सहज  हाताला आलेली पट्टी बरोबर सॅम्पल म्हणून कागदात अलगद  गुंडाळून बरोबर घेतली होती. कार्यक्रमानंतर श्री केबलच्या प्रवीण येलमारांनी, ‘सर, लोकांना नाडीग्रंथांची  झलक दाखवायला म्हणून' एक मुलाखत घ्यायला मला  विनंती केली.  मी तोपर्यंत बरोबर आणलेली ताडपट्टी  काढून ईश्वरनजींच्या हाती दिली व त्यांच्या केंद्रातील नाडीवाचकाकडून त्यातील मजकूर वाचायला  विनंती केली. त्यावर नाडीवाचक  सेल्वमोहनन यांनी नाडीपट्टी हातात घेऊन मोठ्य़ाने त्यातील मजकूर वाचायला सुरवात केली. थोडेसे थांबून त्यांनी सांगितले की ही नाडी ग्रंथाची पट्टी असून  त्यात एका व्यक्तीचे जनरल कांडाचे कथन आहे. आमची उत्सुकता वाढली. नाडीवाचक सेल्वमोहनननी ती पट्टी पुन्हा  पहिल्यापासून वाचायला चालू  केले, तेंव्हा श्री. ईश्वरन त्या पट्टीतील तमिळ मजकुराचा  मराठीत अनुवाद करून सांगत होते.
त्यात त्या  व्यक्तीची जन्मदिनांकाची नोंद अशी होती:- सिद्धार्थी संवत्सर, वैहासी  मासम्, तमिळ तिथी - २२, सित्तिरै नक्षत्रम्, कन्नी रासी, मेष लग्नम्.  मंगळवार. 
नवग्रहांची  मांडणी अशी सांगितली होती – 
- मेष लग्नम्, तेथेच सुक्किरन् आणि मंगळ,
- माडुतनिल् सूरियन्, (वृषभेत सूर्य)
- मिदुनमदिल् पुधन् (मिथुनेत बुध),
- कर्कटगत्तिल् अरसन् (कर्केत गुरु),
- सिम्मत्तिल् अरवु, सनि, (सिंहेत राहू आणि शनि)
- कन्नीयदिल् तिंगळ् (कन्येत चंद्र)
- कुंबमदिल केदु (कुंभेत केतु).
आपल्या सध्याच्या कॅलेंडरप्रमाणे तो दिवस सांगताना मोहनन म्हणाले, सिद्धार्थी संवत्सर म्हणजे (सन १९७९-१९८०), त्या मधील वैशाख महिन्यात (१५ मे ते १५ जून पर्यंत) तमिळ तिथी २२, साधारण ६ किंवा ७ जून १९७९ ही तारीख असावी. लगेच मी माझ्या मोबाईलवर सन १९७९ च्या जूनच्या ६ तारखेला ‘बुधवार’ असल्याचे लक्षात आणुन दिले. त्यावर सेल्वमोहनन म्हणाले, ‘बरोबरच आहे. सुर्य जेथे आहे त्यावरून ६ तारखेच्या मध्यरात्रीनंतर पर्यंतच्या काळातला हा जन्मला असावा. म्हणजेच भारतीय कालमापनाप्रमाणे सुर्योदयापासून सुर्योदयपर्यंत वार मंगळवार असेल’. त्यापुढे श्री ईश्वरन यांनी म्हटले, "पट्टीचे वाचन होताना, ज्या जातकाची ही पट्टी आहे तो प्रत्यक्ष उपस्थित नसेल. नाडिग्रंथसंशोधनावर एक अभ्यास ह्या दृष्टीकोनातून ह्या पट्टीचे वाचन केले जाईल. वाचनाच्या दिवशी ह्या जातकाच्या आयुष्याची ३० वर्षे ६ महिने व ११ दिवस पूर्ण होऊन गेलेले असतील".
त्यावरून  आम्ही गणित घातले ते असे -
| दिवस | महिने | वर्ष | |
| जन्मदिनांक – | ०६ दिवस | ०६ महिने | १९७९ वर्ष | 
| आयुष्य | + ११ दिवस | + ०६ महिने | + ३० वर्षे | 
| नाडीपट्टी वाचनाची तारीख | १७ | १२ | २००९ | 
आश्चर्यकारकपणे नेमक्या त्याच तारीखेला त्या  व्यक्तीच्या अनुपस्थितीत हे वाचन बरोब्बर दिनांक १७  डिसेंबर २००९ लाच होत होते.
मागे  वळून विचार करता -  या पट्टीचे गूढ अधिक वाटू लागले. विंग कमांडर राकेश नंदा मला सहज नाडीपट्ट्चे पॅकेट देतो काय! मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी आठवणीने मी त्यातील नेमकी तीचपट्टी  सहजपणे हाती घेतो काय! इतरांची नाडी पट्टी  वाचायला नकार देणारे नाडीवाचक नेमके त्याच वाचनाला काहीही खळखळ न करता तयार  होतात काय! त्यातील मजकुराची वही बसल्या  बैठकीला करून माझ्या हाती देतात काय! आणलेल्या  ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचूक  तारीख निघते काय! शिवाय हे सर्व शूटींग होऊन  ते लोकांसमोर सादर होते काय!  
त्यादिवशी हे सारे ऐकून आम्ही सारे थक्क झालो!!
त्यादिवशी हे सारे ऐकून आम्ही सारे थक्क झालो!!
त्यानंतर याच कथनावर आधारित चर्चेचे  व्हीडीओ शूटिंग दिनांक १९ डिसेंबर २००९ ला प्रसारित झाले. आपल्यापैकी  काहींनी ते पाहिले देखील असेल. त्या पट्टीचा स्कॅनफोटो तयार झाला. वही तयार  झाली. त्याची सीडी नाडीग्रंथावरील कार्यशालेसाठी उत्सुकांना पहायला तयार  ठेवली आहे.
या ठिकाणी नाडी ग्रंथांची एकांगीपणे टिंगल-टवाळीकरून  नाडीपट्ट्यांना थोतांड म्हणून हिणवणाऱ्यांना ही पट्टी सत्यान्वेषण करायला  उद्युक्त करेल अशी आशा वाटते. 
 
  
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा