Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

Thursday, 29 July 2010

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन

प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.

दि. ५जून २०१०, शनिवारी सकाळी दहा वाजता जुन्या टाऊन हॉलच्या एका मोठ्या हॉलमधे अधिवेशनाची सुरवात झाली. त्याआधी नऊ वाजल्यापासून बाहेर ज्यांनी आपली नावे नोंदवली होती त्याचे व नविन लोकांचे नावनोंदणीचे काम करायला गर्दी जमा झाली होती. पण कुठेच धक्काबुक्की नव्हती. शांतपणे लोक क्यूला उभे होते. असो.

जोसेफ श्रोटर यांनी अधिवेशनाची सुरवात झाल्याचे जाहीर केले. मात्र स्टेजवर नेहमी प्रमाणे टेबलखुर्च्यांची मांडामांड नव्हती की समईच्या दीपप्रज्वलनाची सोय. मात्र मी आणलेल्या अगस्त्य व भृगु महर्षींचे फोटो आवर्जून ठेवले गेले होते.

पॉवेलने अगोदर सांगून ठेवले होते. त्याच्या भाषेत, "आय दोंत लाईक आरेंजमेत ऑफ स्तुपीद कम्युनिस्ट. नोथिंग ऑन स्टेज." त्याप्रमाणे स्टेजवर मांडामांड होणार नाही. साधेपणाने प्रत्येकाने उभे राहून बोलायचे आहे. माईक हातात घरून.

आम्हाला पुढील रांगेत बसायची सोय होती. चीफ नाडी ग्रंथ वाचक शिवषणमुगम, दुसरे नाडी वाचक पलनी त्यानंतर भाषांतरकार रवी, स्वतः पॉवेल, नाडी ग्रंथ प्रेमी मेरीया, तिची वृद्ध आई धेनका व अन्य काही पहिल्या रांगेत होते. स्टेजच्या एका बाजूला माईक व व्हीडिओ शूटिंगच्या टीममधे काम करणारे जॉन, मीशा, येरी तत्परतेने उभे होते. आम्हा भारतातून आलेल्या निमंत्रितांचा सत्कार रुबाबदार पुष्पगुछ्यांनी झाला.

जोसेफ श्रोटर प्रागमधील एक मान्यवर सायकिक अनॅलेलिस करणारे एक्सपर्ट म्हणून गणले जातात. त्यांनी प्रथम सत्रात सिक्स्थ सेंन्स व नाडी ग्रंथ यावर आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा त्यांचा मुलगा रोडिक मला दबक्या आवाजात सांगत होता. त्यांचे संपुर्ण (पॉवर पॉईटवरून केलेले) भाषण वेगळे येथे वाचायला मिळेल. त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होऊन उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. नंतर माझी वेळ आली. मी आधीच्या श्रोटरांच्या भाषणातील धागा पकडून नाडी ग्रंथांतील कथन हे मानवी बुद्धीच्या पलिकडील वैश्विक ज्ञानाच्या साठ्यातून मिळवलेले असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महर्षींचीच कथने त्याला पुरक आहेत असा खुलासा केला. त्याआधी मी थोडक्यात या अधिवेशनाचा माझ्या दृष्टीने उद्देश व महत्व कथन करणारे निवेदन व स्वागत भाषण केले. माझ्या भाषणाचा अनुवाद रोडिक तत्परतेने करत होता. वेळोवेळी ऐकू येणाऱ्या टाळ्यांमुळे माझे म्हणणे श्रोत्यांपर्यंत पोचत असल्याचे जाणवत होते.

मी नजरेने केलेल्या मोजणी प्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. त्यानुसार सुरवातीला १२० श्रोते होते नंतर वाढून १४० जमले असावेत. माझ्या नंतर मेरीयाने तिचा नाडी ग्रंथांचा भारतातील अनुभव थोडक्यात कथन केला. मग जेवायला सर्व पांगले. भोजन आपापले सोईने करायचे होते. त्यामुळे भारतात हटकून दिसणारी भोजन भाऊंची लगबग इथे नव्हती.

आम्हाला जवळच्या एका रेस्तोरॉंमधे नेले गेले. नेहमी प्रमाणे बीरची ऑर्डर झाली. “पटा पटा आटपा” असा खाक्या नव्हता. तरीही आम्ही तासाभरात हॉलवर वेळेवर परतून पुढील कार्यक्रमात सामील झालो. नंबर माझ्याच होता. यावेळी मला आलेल्या विविध अनुभवांचे कथन करायला सांगण्यात आले होते. योगी रामसुरत कुमारांचा व पॉन्डेचरीतील अरविंदाश्रमाचा भाग सांगताना वेळ संपली. कारण मला रोडिकच्या झेकमधील रुपांतरासाठी वेळ द्यायला लागत होता. असो.

त्या नंतर शिवषण्मुगना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात तमिळ गायनाने अनेक महर्षींची आळवणी करणारे गायन केले. त्यावर श्रोत्यांच्या आनंदाच्या टाळ्या आल्या. त्यांनी व पलनीने शिवस्तुतीही म्हटली. पुन्हा मला बोलायला आमंत्रित केले गेले. यावेळी मी नाडी ग्रंथांतील विविध कांडांची रचना व त्यातील मजेशीर माहिती दिली.

त्यानंतरच्या सत्रात मानवीशरीरातील सात आंतरअंगांची कल्पना मी सांगितली व चौथ्याशरीरातील विविध शक्ती प्राप्त महर्षींनी संपुर्ण मानवाला देश, धर्म, जाती वा भाषा आदिंची बंधने झुगारून केलेली ही अनन्य साधारण मानवतेची सेवा आहे असे ठासून सांगितले. असा अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला.

दि ६ जून २०१०.

जास्त वेळ न दवडता अधिवेशनाचे पहिले सत्र माझ्या भाषणाने सुरू झाले. त्यात मी नाडी ग्रंथात सुचवलेले शांती दीक्षेचे उपाय करायची गरज व ज्यांनी ते केले त्यांच्या अनुभवांची कथने सादर केली.

त्यानंतर शिवषण्मुगमना पाचारण केले गेले. त्यांनी त्यांच्या बद्दल व नाडी वाचनाच्या अनुभवांबद्दल कथन केले. बालपणापासून त्यांनी कसे शिक्षण घेतले. कसून अभ्यास केल्यानंतर गेली २५ वर्षांत त्यांनी हजारोंच्या संखेने नाडी ग्रंथांचे वाचन कले आहे. त्यांनी सर्वात जास्त जपानहून येणाऱ्या दहा हजाराच्यावर लोकांची नाडी ग्रंथ कथने केल्याचे ऐकून श्रोते थक्क झाले. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. आपली नाडी ग्रंथांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे विनम्रपणे सांगितले.

शिवाने नंतरच्या आपल्या कथनाची सुरवात ओमकाराने केली. आम्ही त्याला म्हणून साथ दिल्यावर उपस्थित सर्वांनी ओमकार म्हणून सभागृहात एक गूढ गंभीर नाद विलक्षण प्रभाव पसरला. शिवाने पॉवेलची मैत्रिण मारियांच्या “धेनका” नावाच्या मातेचा अगस्त्यमहर्षींनी आपल्या नाडीग्रंथांत मदरमेरीच्या अंशाचा जन्म असल्याचे कथन, त्यांच्या प्रेमळ नजरेचा “दिव्यदृष्टी” म्हणून महर्षींनी केलेला गौरव ऐकून उपस्थितांपैकी धेनकांच्या कृपादृष्टीची जाण व महत्व आधीच माहित असणाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आपली संमती दर्शवली.

दुपारच्या भोजनाच्या विश्रामात व नंतर लोकांचा गराडा व प्रत्येकाला आमच्याशी बोलायची उत्सुकता जाणवत होती. मात्र योग्य रुपांतरकार नसल्याने जे त्यातल्या त्यात इंग्रजीत बोलत होते त्यांच्यापाशी गर्दी होत होती. मधल्या काळात लोकांनी आपल्या शंका एका बॉक्समधे लिहून पाठवाव्यात असे सुचवल्याप्रमाणे अनेक विचारणा आल्या होत्या. त्याला वेळ देऊन नव्या सत्राची सुरवात झाली. बहुतेकांचा सुर काहीच माहिती वा अनुभव नसल्याने आमच्या कथनातील थक्क करणाऱ्या गोष्टींच्याबद्दल आणखी जाणून घेण्याचा होता.

त्यानंतर शिवषण्मुगमनी नटराजाच्या मुर्तींच्या गौरवचिन्हांनी जोसेफ, मेरिया, धेनकांना “होली मदर” असे गौरवून सत्कार केला. मी शालीं पाठींवर घालून त्यांना गौरवले. पॉवेलला मी एक गणेशाची एबस्ट्रॅक्ट रुपातील सुंदर फ्रेम देऊन सन्मान गेला. नंतर पॉवलनी माईक हातात घेऊन आपले निवेदन केले. शेवटी मुख्य नाडी वाचक शिवानी अगस्त्य, वसिष्ठ, काकभुजंदर, शुक, कौशिक, भृगु आदि अनेक महर्षींच्या केलेल्या स्तुतीने पुन्हा सभागृह भारले गेले. त्यानंतर आमचे रीतसर आभार मानून अधिवेशनाची सांगता झाल्याचे जोसेफ श्रोटरनी जाहीर केले.

असे हे पहिले आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले.

बायकांचा सुळसुळाट!!

अधिवेशनाला जमलेल्यात समाजात ९५ टक्के स्त्रियांचा भरणा होता! काही विविध तंग पोषाखातील तरुणी, काही उच्च विचारांच्या गर्भश्रीमंत वाटल्या, तर काही पन्नाशी नंतरच्या! काहींशी बोलताना भारताबद्दल खुप माहिती असलेल्या तर काहींना योगा, प्राणायाम, मंत्र, आस्त्रालोगी(जी), एनर्गी(र्जी) लेवल वर अभ्यास केल्याची जाण असलेल्या विदुशी होत्या. उरलेले पुरुष मारुन मुटकून आल्यासारखे चेहरे करून बसलेले वाटत होते. काही पुरुषांनी मात्र खुप प्रश्न विचारून आपली जागरूकता दर्शवली.

पाप्यांचा कहर !

विदेशात एकमेकांना भेटायच्या व अभिवादन करायच्या विशिष्ठ पद्धती आहेत. कधी हस्तांदोलन तर कधी एकमेकांजवळ अलगद येऊन गालाला हलकेच पुसट स्पर्ष गालाने वा ओठांनी करून भेटीचा आनंद व्यक्त करायची प्रथा आहे. आम्हाला याची सवय नसल्याने प्रत्येक जण मिठीत घेऊन दोन्ही गालांवर देणाऱ्या हलक्या चुंबनाची सवय करून घेता घेता आमची तारांबळ उडत होती. विशेषतः स्त्रियांच्याकडून मिळणाऱ्या तशा जोरदार प्रतिसादाला!

पलनी न राहवून म्हणाला, “ सामी, हमने अबतक अपने वाईफका भी इतनी बार लिया नही होगा इतना यहां एक दिन में हुवा!“

मी त्याला कौतुकाने मान डोलवून होकार भरला. नंतरच्या सहवासात नाडीवाचक अशा प्रतिसादाला समरसून उत्तर देऊ लागल्याने ते या प्रथेला रुळल्याचे जाणवले. असो.

त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्याचे सर्वांसाठी व्हीडीओ शूटिंग होत होते. काहींना अगदी प्रथमपासून नाडीपट्टी उघडल्यापासून रेकॉर्डिंग हवे होते तसे त्यांना वेगळे पैसे भरुन मिळवायची सोय होती. प्रत्येकाने आपापली इंग्रजीतून झेक भाषेसाठी भाषांतरकाराची सोय करायचा होती.

शेवटच्या दिवसात या अधिवेशनाचा थोडक्यात अहवाल व फोटो रेजेनेरेस नावाच्या मासिकात छापुन आल्याचे कळले.

----------------------------------------------------------------------------------

रेजनरेस जुलै २०१० मासिकाचे मुखपृष्ठ

प्राग अधिवेशनाच्या स्टेजवर डावीकडून भाषांतरकार रवी, शशिकांत ओक, झेक रुपांतरकार रॉडीक, नाडीवैचक शिवा, मारिया, पलनी, पॉवेल, व जोसेफ श्रोटर. दि ५-६ जून २०१०.

शिवा नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवताना व पलनी नाडी वाचनात दंग
Post a Comment