कूटलिपी म्हणजे काय?
१. आरंभ - सत्यशोधनासाठी अभ्यासाची आवश्यकता
२. पूर्वपीठिका - स्त्रोत
३. ग्रंथलिपी म्हणजे काय - एक ओळख
४. ग्रंथलिपीचा उपयोग आणि भिन्न रुपे
५. नाडीपट्टींमध्ये आढळणारी लेखनशैली
६. कूटलिपी कां म्हणतांत? शब्दार्थ
७. कूट्टेळुत्तु - तमिळ शब्दार्थ - युक्ताक्षरे ही संकल्पना - नाडीग्रंथांच्या संदर्भातील कूट्टेळुत्तु चे स्थान.
८. तात्पर्य आणि पुढील संशोधनाची आवश्यकता
1. नाडिग्रंथ-नाडिपट्टीआधारे भविष्यकथन करण्याच्या प्रकारामध्ये "जातकाकडूनच विविध मार्गांनी माहिती काढून, आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन, तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो" असा एक संशय नेहमी घेतला जातो. ह्या संशयाचे निराकरण करण्याकरता काही बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्यता काय आहे हे स्पष्ट होईल. ह्यासाठी सर्वप्रथम नाडीग्रंथांमधील लेखनाची तपासणी करणे आवश्यक ठरते. स्वत: नाडिवाचक असे सांगतात की नाडिपट्टींमध्ये जातकाच्या भविष्याचे लेखन केलेले असते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे लेखन तमिळ भाषेत, ’कूट’ लिपीमध्ये असते. तर ही ’कूटलिपी’ म्हणजे ह्या विषयाच्या अभ्यासामधील एक ’अडथळा’ आहे असे अभ्यासकांकडून बहुधा सांगितले जाते. ह्या विषयावर - पर्यायाने, खरोखरीच काही लेखन केलेले असते काय - ह्यावर अधिक अभ्यास करणे आणि सत्याचा शोध घेणे हे नाडिग्रंथ-नाडिपट्टी-नाडिभविष्य ह्यांबाबत काही मते बनविण्यापूर्वी अत्यंत आवश्यक ठरते.
2. माझा स्वत:चा ब्राह्मी जनित - अरबी जनित - आणि अन्य जवळपास ७० लिपींचा तसेच लिपीशास्त्राचा अभ्यास आहे. लिपीशास्त्राभ्यासासाठी एक जिज्ञासा म्हणून काही निमित्ताने नाडिपट्टीची काही चित्रे आंतरजालावर शोधली आणि त्यातील लिपीबद्दल शोध घेतला. ह्यानंतर काही तमिळभाषक स्नेह्यांच्या ओळखीने काही नाडिवाचकांशी चर्चा करण्याचा योग आला. अनेक पट्टी बघण्याचा आणि हाताळण्याचा योगही आला. ’भविष्य’ ह्या शब्दास सर्वस्वी दूर ठेवून वस्तुनिष्ठ पद्धतीने केवळ लिपीचा अभ्यास करताना असे लक्षात आले की जिला ’कूटलिपी’ असे म्हटले जाते आहे, ती वास्तविक पाहता ग्रंथलिपी नामक एक प्राचीन लिपी आहे.
3. ग्रंथलिपि (तमिळ भाषेत: கிரந்த ௭ழுத்து) ही दक्षिण भारतात पुरातनकाळापासून प्रचलित असलेली प्राचीन आणि महत्त्वपूर्ण अशी एक लिपी आहे. सामान्यत: हिची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली असल्याचे विद्वानांचे सर्वमान्य मत आहे. आधुनिक काळातील सर्व दक्षिण भारतीय भाषांच्या स्वतंत्र लिपींवर तसेच सिंहल लिपी, पल्लव लिपी, मोन लिपि, जावा लिपी, ख्मेर लिपी ह्या आणि अशा अनेक लिपींवर ह्या ग्रंथलिपीचा बराच सखोल प्रभाव दिसून येतो. ह्या अनेक लिपींचा उगम हा ग्रंथलिपीमध्येच आहे असेही लिपीशास्त्राभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.
4. संस्कृत साहित्यलेखन करण्यासाठी देवनगारी लिपीचा उपयोग होण्यापूर्वी ग्रंथलिपीचा उपयोग होत असे. दक्षिण आशियाई तमिळभाषी क्षेत्रांमध्ये जवळजवळ १९ व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेत साहित्यलेखन करण्यासाठी ग्रंथलिपीचा उपयोग होत आलेला आहे. विद्वानांच्या मतानुसार ही लिपी इ.स.पूर्व २०० पासून वेगवेगळ्या रूपामध्ये अस्तित्त्वात आहे.
ग्रंथलिपीची भिन्नभिन्न काही रूपे आहेत. ही भिन्नरूपे साधारणत: दोन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहेत.
सुदैवाने ह्यापैकी अनेक रूपे आपणास दक्षिणभारतातील मंदिरांमध्ये भित्तीलेखनाच्या स्वरूपात आजही आढळतात. मैसूरु विश्वविद्यानिलय प्राच्यविद्यासंशोधनालयाने ग्रंथलिपीवर बरेच संशोधन केलेले आहे. प्राच्यविद्यासंशोधनालयाने काही दशकांपूर्वी ग्रंथलिपीचा विकास होतानाची जी अनेक रूपे आहेत तिचा एक तौलनिकदृष्ट्या अभ्यास विस्तृत निबंधरूपाने उपलब्ध करून दिला होता. ही सारी रूपे प्रथमदर्शनी एकमेकांपासून भिन्न जरी दिसत असली, तरीही सर्वसामान्यपणे ह्यास ग्रंथलिपी हेच संबोधन आहे. (जसे देवनागरी लिपीचीही विकसनकालातील अनेक विविध रूपे असूनदेखील सर्वसामान्यपणे त्यांना ’देवनागरी लिपी’ असेच म्हटले जाते.)
5. नाडीपट्टींमध्ये आढळणारी ग्रंथलिपीची स्वत:ची विशिष्ट अशी एक शैली आहे. मूळ ग्रंथलिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे तीन मजली लिपी आहे, तर नाडीपट्टीमध्ये ती दोन मजली असल्याचे आढळते. ह्यासह, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शीघ्रगतीने लेखन करणे सुलभ व्हावे म्हणून बाळबोध लिपीची अक्षरे हात न उचलता लिहिली जात असत (मोडी लिपी) त्याचप्रमाणे नाडिपट्टींमधील लेखन शीघ्रगतीने व्हावे यासाठी हात न उचलता ग्रंथ लिपीत लिहिण्याची शैली विकसीत केली गेली आहे. असे करत असताना मात्र मूळ ग्रंथलिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, त्यामुळे सामान्य अभ्यासकास ही लिपी प्रथमदर्शनी ग्रंथलिपी न वाटण्याचा संभव आहे. तसेही ही लिपी ग्रंथलिपी न वाटण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे, ग्रंथलिपीचे प्रमाणीकरण होण्यापूर्वीची भिन्नरूपे त्यांच्याशी परिचय नसणे, आणि दुसरे म्हणजे हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमुळे ही लिपी थोडी दुर्बोध होते. परंतु सखोल अभ्यास करता ही लिपी व्यवस्थित वाचताही येवू शकते. नाडिपट्टींमधील मूळ लिपी ही ग्रंथलिपी असल्याबद्दल लिपीशास्त्राभ्यासकांचा काही वाद होणार नाही अशी खात्री वाटते.
ह्या प्रकारची लिपी केवळ नाडीपट्टींमध्येच आढळत नसून इतरत्रही आढळते. माझ्या पाहाण्यात हितोपदेश, सिद्धऔषधयोजना इ.इ. ग्रंथांची हस्तलिखिते आलेली आहेत, त्यातही अशाच प्रकारच्या लिपीचा उपयोग केला गेल्याचे दिसते.
6. असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी न म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम ’कूटलिपी’ ह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. ह्या लिपीला ’कूटलिपी’ असे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे. (नाडिवाचक स्वत: त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्ये ’कूट’ म्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत. ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा अर्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे. परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही. आपल्या येथील एका अ-तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट न घेता वाचता आलेली आहेत. तरीही ही लिपी कूट (सांकेतिक) असावी काय?
7. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ’कूट्टेळुत्तु’ ह्या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. ह्यासाठी लिपीशास्त्रातील ’युक्ताक्षर’ ह्या संकल्पनेची उजळणी करावी. ’युक्ताक्षर’ हा संस्कृतभाषी शब्द आहे. मराठीभाषेमध्ये ह्या शब्दास ’जोडाक्षर’ म्हणतात. देवनागरी लिपी आणि इतर तीसदृश लिपींमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली गेली म्हणजे त्या अक्षरांतून नवीन युक्तचिह्नाक्षरे सिद्ध होतात. ही युक्तचिह्नाक्षरे बरीचशी मूळ अक्षरासारखी दिसणारी परंतु मूळ अक्षरापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी असतात. ह्या अक्षरांनाच सामान्यपणे युक्ताक्षरे असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ: श्री = श् + र् + ई = असे न लिहिता, ’श्री’ असे लिहिले जाते. ’श्री’ हे युक्ताक्षर होय. लिपीशास्त्राभ्यासकांचे एक आवडते उदाहरण द्यावयाचे झाल्यास, संस्कृत शब्द ’कार्त्स्न्यम्’ ह्याची रचना क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म् अशी असून, तो ’का र्त्स्न्य म्’ असा लिहिला जातो. ह्यात ’र्त्स्न्य’ हे युक्ताक्षर आहे.
नाडिग्रंथ-नाडिपट्टी आणि नाडिभविष्य ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? कारण नाडिग्रंथामध्ये जे तथाकथित भविष्यकथन लिखितस्वरूपामध्ये उपलब्ध आहे असे सांगितले जाते, ते तर तमिळभाषेमध्ये आहे. आणि तमिळभाषेमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही! तमिळ लिपीमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली जातच नाहीत, त्यामुळे युक्तचिह्नाक्षरे - थोडक्यात युक्ताक्षरे - सिद्ध होत नाहीत.
उदाहरण: वर दिलेला ’कार्त्स्न्यम्’ हाच शब्द तमिळ लिपीमध्ये लिहायचा झाल्यास க் + ஆ + ர் + த் + ஸ் + ன் + ய் + அ + ம் (क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म्) अशी फोड असली तरीही तो கார்த்ஸ்ன்யம் असाच लिहिला जाईल. ह्याचे कारण असे, की आधुनिक तमिळ लिपीमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही. अक्षरे एकास एक जोडून लिहिली न जाता, एकासमोर एक लिहिली जातात. ज्या अक्षरांचा हलन्त उच्चार असेल, त्यांच्या डोक्यावर पुळ्ळि (बिन्दु) देऊन त्यांचे अपूर्णत्त्व स्पष्ट केले जाते.
ह्याच युक्ताक्षरांना तमिळभाषेत ’कूट्टेळुत्तु’ असे म्हणतांत. (कूडऽ एळुदिनदु ஃ कूट्टेळुत्तु = एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे)
तमिळ लिपीमध्ये जोडाक्षरेच नसताना, कूट्टेळुत्तु हा शब्द नाडीग्रंथांच्या लेखनाबाबत का योजिला जातो आहे? ते लेखनदेखील ग्रंथलिपीमध्ये आहे, तर ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? ह्याचे कारण असे की कूट्टेळुत्तु ह्या शब्दाचा ’जोडाक्षरे’ असा एकमेव अर्थ नसून एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असाही अर्थ होतो. नाडीग्रंथांच्या लेखनाबाबतीत बोलावयाचे झाल्यास ह्यातील ग्रंथलिपी ही बरीचशी मोडी लिपीसारखी हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमध्ये (पक्षी : एकत्रितरीतिने, सोबत लिहिलेली, एकसारखी अशी) असल्यामुळे ’कूट्टेळुत्तु’ असा शब्द तिच्याबाबतीत उपयोजिला जातो. ती लिपी सांकेतिक आहे म्हणून नव्हे!
8. तात्पर्य : ’कूडऽ एळुदिनदु’ म्हणजे एकत्रितरीतिने लिहिले गेलेले असे हे लेखन. हे लेखन ग्रंथलिपीमध्ये ग्रथित करून ठेवलेले असते, म्हणून ग्रंथ हा शब्द ஃ नाडिग्रंथ.
माझ्या अभ्यासावरून मी हे खात्रीने सांगू शकतो की नाडिपट्टींमधील लेखनाप्रमाणे लेखन करावयाचे झाल्यास सदर मनुष्यास लिपीशास्त्राचा सखोल अभ्यास आणि अनेक वर्षांचा सराव केल्याखेरीज शक्य नाही. खरे पाहता ह्या विषयावर नव्या दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे, परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह ’ज्योतिष’ किंवा ’भविष्य’ हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.