Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

पुम्बुहारचे भीषण समुद्रस्नान (पुनर्संपादित लेख)

  


पुम्बुहारचे भीषण समुद्रस्नान



"मी तटस्थ रहायचा प्रयत्न करत असतानाच पुढची लाट आली. गंभीर गर्जनेसह ... धडाऽऽल्ल करत शिळांवर आपटली. माझे हात मनोमन जुळले. मी महर्षींचे स्मरण करून म्हटले, “हे महर्षी, माहित नाही आपण माझी परीक्षा कां घेत आहात ते...पण मी माझ्याकडून आपल्या कथनाप्रमाणे पोचलो आहे. जगायचे का मरायचे ते आता माझ्या शारीरिक कुवतीच्या पुढे गेले आहे. आपली कृपा असावी....”



नाडीग्रंथ हिन्दी में कथनांतील एक महत्त्वाचा भाग असतो, विविध क्षेत्रातील स्थळांना भेटी देऊन तेथे अर्चना, अन्नदान, वस्त्रदान आदि कृत्ये श्रद्धापूर्वक करणे. मंदिरांच्या त्या स्थळांना शोधून वेळेवर पोहोचणे महत्त्वाचे. दक्षिणेत साधारण दुपारी १२ ते ४ मंदिरांचे दरवाजे बंद होतात. मग खोळंबा होऊन पुढील कार्यक्रमावर प्रभाव पडतो. म्हणून आखणी करताना वेळा लक्षात घेऊनच प्रवास ठरवावा लागतो. मात्र कितीही ठरवले तरी ऐनवेळी काहीतरी कारणांनी वेळा पुढे पुढे ढकलल्या जातातच. माझेही असेच काहीसे झाले.


स्वामीमलाई, सूर्यनार कोईल करत करत तिरुनल्लारला रात्री साडेआठला पोहोचलो. तोवर मंदिरात शुकशुकाट झाला होता. त्यात शनिदेवाचे उपमंदिर शोधण्यात वेळ गेला. तेथे दीप लावून व मुख्य मंदिरातील शिवाच्या स्थळी अर्चना करून परत फिरलो. मंदिराच्या बाहेर टॅक्सीवाल्याच्या शोधात अर्धा तास गेला. उशीर झाल्याने रागावलेला ड्रायव्हर आमच्यावर मोठ्या आवाजात डाफरत होता. आमच्या उशीराला कारण होते ते असे की आम्ही मंदिरात मधे पोचलो ते गोपुर - महाद्वार - एका दिशेचे होते. परतताना ज्या गोपुरातून आम्ही बाहेर पडलो ते वेगळ्याच दिशेला तोंड करून होते. त्यामुळे चुकामुक झाली. बरं त्याच्याकडचा मोबाईल काम करत नव्हता. असो.


त्या ठिकाणाहून आम्हाला पुम्बुहार या समुद्र किनार्‍यावरच्या गावात जायचे होते. ‘कावेरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या गावात समुद्रस्नान करावे’ असा एका नाडी महर्षींचा आदेश होता. ३५-४० किमीचा प्रवास असावा. सोबत हैयो हैयैयो चिडलेल्या ड्रायव्हरशी तमिळमधे बोलून त्याला झालेला घोटाळा सांगून शांत करत होते. मग अन्य विषयावर गप्पात कसा वेळ गेला कळले नाही. रात्रीचे नक्की किती झाले होते माहित नाही पण ११:३० तरी झाले असावेत. आमची टॅक्सी समुद्रकिनार्‍या पासून साधारण ३०० मीटर लांब उभी करून तो ड्रायव्हर सिगारेट शिलगावत म्हणाला, ‘इथेच थांबवतो. पुढे बॅरिकेड्स आहेत. इथून चालत चालत समुद्राजवळ जाता येईल.’


पौर्णिमेच्या गोलाकार चंद्राच्या प्रकाशात, मी पायातील चपला टॅक्सीतच काढून अनवाणी रेतीतून किनार्‍याकडे झराझरा निघालो. समुद्राच्या गाजेचा गंभीर आवाज येत होता पण अंधार्‍यावाटेत लाटा काही दिसत नव्हत्या. हैयो हैयैयो रेंगाळत रेंगाळत माझ्या मागून येत होते. अगदी जवळ आलो तेंव्हा कळाले की बहुधा सुनामीच्या कहरानंतर या किनार्‍यांना सुरक्षेसाठी मोठमोठ्या शिळा आणून बंधारा केला गेला आहे. त्यामुळे मला समुद्रात शिरायचे तर त्या शिळा पार करायच्या होत्या. काही शिळांवर पावले ठेवताच त्या किती अणकुचीदार आहेत याची त्वरित कल्पना आली. त्या डगडगत्या व काळ्याकभिन्न पत्थरांवर चढून, अनवाणी पावलांनी, साधारण २०-२५ फूट पाण्यात खाली उतरून जाणे रात्रीच्या वेळी फार धोक्याचे आहे, हे धडधडीत दिसत होते. मला पाण्यात शिरुन स्नान करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी फक्त टॉवेलची तयारी करून आलो होतो. एकदा कपडे भिजले की अंगावरच वाळवायचे असा बेत होता.


तिकडे एक एक लाट त्या बांधाच्या पत्थरांवर जोरात धडकत होती प्रत्येक वेळी शुभ्र फेसाची चादर पसरून लुप्त होत होती. लाट धडकताना होणारा प्रचंड धडाकेबाज आवाज समुद्राच्या रौद्र स्वरूपाची भीषणता दाखवत होता. खूप दूर एक दोन लुकलुकणारे दिवे होते. काही वेळ मी नुसताच त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात घालवला. काही वेळानी कोणीतरी लोक बोलतायत असे वाटले. तोवर हैयो हैयैयोंनी लांबून तंजावूरी मराठीत ओरडून सांगितले, ‘साहेब, तिकडे लांबवर काही कोळी लोक आपापसात बोलतायत. त्यांना मी विचारून आलो तर ते म्हणतात, आणखी काही अंतरावर एके ठिकाणी या बांधाला पार करता येईल अशी एक जागा आहे. तेथून समुद्रात उतरता येईल पण आत्ता भरतीची वेळ आहे. तेव्हा धोका आहे. जपून उतरावे.’ मी हिय्या करून काही शिळांवर पाय ठेवत वरून खाली पाण्यात उतरताना काय घडेल याचा अंदाज घेतला. उतरताना तोल जाणार व धडपडायला होणार. एकदा कोसळलो तर कपाळमोक्ष झाला नाही तरच नवल असे वाटून मी काय करावे असा विचारात वेळ घालवला.


मग वाटले त्या कोळ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती जागा शोधावी. त्या प्रमाणे मी बांधाच्या काठाने जाताजाता एक तारेचे कुंपण लागले ते ओलांडून मी एका पाणथळाशी आलो. तेथून पुढची वाट दिसली त्यातून सरकत सरकत मी बांधाशी समांतर एके ठिकाणी आलो. प्रत्येक पावला गणिक तळपायांना असह्य वेदना होत होत्या. छाती धडधडत होती. हातांना बारीक कंप सुटला होता. मी काय करतोय ते मलाच नक्की माहीत नव्हते. करता करता मला लाटा दिसायला लागल्या. अंदाज घेण्यासाठी काही शिळा उतरलो. डगडगत्या मनाने पावले पडत होती. एके ठिकाणी जरा पावले टाकता येतील इतपत आधार मिळाला. धीराने पुढे जाताजाता मी समुद्रातील लाटांच्यापाशी पोचलो. पँट गुडघ्यापर्यंत वर करून लाटांतील पाणी हातात घेतले. तोवर एक लाट आली गुडघ्यावर पाणी आले. फेसाळ पाण्याची परततानाची जोराची ओढ तोल घालवणारी होती. तरी मी पुढची लाट येताना पहात होतो. तिसरी लाट त्याच्यापेक्षा जोरात व आवाजात आपटली. शरीर आपल्या आपणच स्नान करु लागले. मी तटस्थ रहायचा प्रयत्न करत असतानाच पुढची लाट आली. गंभीर गर्जनेसह ... धडाऽऽल्ल करत शिळांवर आपटली. माझे हात मनोमन जुळले. मी महर्षींचे स्मरण करून म्हटले, “हे महर्षी, माहित नाही आपण माझी परीक्षा कां घेत आहात ते...पण मी माझ्याकडून आपल्या कथनाप्रमाणे पोचलो आहे. जगायचे का मरायचे ते आता माझ्या शारीरिक कुवतीच्या पुढे गेले आहे. आपली कृपा असावी....”


सुन्न करणारा एकांतवास... तुफानी लाटांच्या रौद्र गर्जना... सागराच्या भीषणतेतील ते सौंदर्य.... वर आकाशात पूर्णचंद्र... क्षणभर त्या लाटा विविध प्रकारच्या लोकांचे अनुभव घेऊन मला धडकणार्‍या व्यक्ती वाटल्या. कुठूनसा अंतर्मनातून आवाज आला.. "वृत्ती कणखर व सत्यशील असेल तरच तू आज तरशील". अन्यथा काय होईल ते दाखवायला बहुधा मला इथे आणले होते की काय असे क्षणभर वाटले....


 ... प्रिय व्यक्तीसाठी तुला समुद्रात तर्पण करायला यावे लागेल असा पुर्वसंदेश द्यायला जणू मला बोलावले गेले होते कि काय?...


पुढे काय घडले ते हैयो हैयैयोंच्या 'तंजावूरी मराठी' शब्दांत....

 

तिरुनळ्ळार्रु च्या शनिमंदिरातून बाहेर येताना निष्कारण विलंब झाल्याकारणे कृद्ध झालेल्या वाहनचालकासह वार्ता करित त्यास शांत करण्याचे यत्न एकीकडे करित होतो, तर दुसरीकडे वाहनचालक तमिळमध्ये सांगतो त्याप्रमाणे ‘ही समुद्रस्नानाची वेळ खरोखरीच नव्हे’ असे श्री. ओक साहेबांस मराठीमध्ये पटवून देण्याचा प्रयास करित होतो. पूम्बुगाराहून चेन्नैस परतण्यास बहुधा सकाळ होणार ह्या विचाराने वाहनचालक भयंकर अस्वस्थ होता, त्यातच दोन दिशांच्या दोन विचारांमध्ये ताळमेळ घडविता माझ्या मेंदूचे मात्र संधिखाद्य होत होते. त्यातच पूम्बुगारास पोहोचणेस रात्रीचे सुमारे ११:३० वाजले. त्या अवेळी सारे गांव निद्रिस्त होते, नांवास चिटपाखरूही दिसत नव्हते. एक प्रकारची भीषण शांती आसमंतात पसरलेली पाहून खरेतर इतर कोणीही भिवून माघारी फिरले असते. परंतु...

 

...दुरून दृष्टीपथास समुद्रकिनारा येईल अशा बेताने एका ठिकाणी वाहन उभे करून “येथून पुढे पायी-पायी जावे, बॅरिकेड्स आहेत, वाहन पुढे नेता येणार नाही” असे उद्दामपणे सांगता सांगता, चालकाने रजिनिकांत पद्धतीने सिगारेट शिलगावून हवेत नाराजीच्या धुराची वलये भिरकाविली. “कोण कुठून कुठून लोक येतात, कसल्या डोंबलाच्या पूजा घालतात, आणि त्यांच्यापायी आमचा मात्र वेळ जातो..” असा जो रोषाचा सूर त्याने लावला होता, त्यास शांतविण्यासाठी काय सांगावे असा विचार मी करित असतानाच, श्री. ओक साहेब समुद्राच्या दिशेने दण्णदण्ण चालत निघालेले मला दिसले आणि त्या दिशेने मीही चालत निघालो. श्री. ओक साहेबांचा उत्साह पाहून मीही वेगे वेगे चालण्यास प्रेरित होत होतो, परंतु दिवसभराचा थकवा वागविताना माझ्याकडून बेताच्याच वेगाने चालणे होत होते.


चालता चालता समुद्राच्या पायवाटेवर तमिळ भाषेमध्ये सावधानतेच्या सूचनांचे फलक जागोजागी लावलेले दिसले, ते पाहून त्यासंबंधी श्री. ओक साहेबांस कल्पना द्यावी म्हणून पुढे निघतो, तर एका बाजूस दोघेजण संवाद करितांना दिसले. त्यांच्या भाषेवरुन आणि समुद्राच्या स्वभावाची मजपेक्षा त्यांस असलेली ओळख पाहून ते दोघे मत्स्योपजीवी असावेत असे वाटले. त्यांस मी एकूण परिस्थिती निवेदिली आणि किनार्‍यावरील अवजड शिलाखंड पाहता त्यांस टाळून समुद्रस्नानाकरिता सुरक्षित जागा कोणती असावी असे विचारले. “काही अंतरावर एके ठिकाणी शिलाखंडबंधास पार करता येईल असे एक ठिकाण आहे. तेथून जानोपरि जलाशयात अवश्य उतरता येईल, परंतु सध्या भरतीची वेळ असल्याकारणे तसे करण्यात धोका असून जरा जपूनच कार्य उरकावे.” असे कथन त्या मत्स्योपजीवींपैकी एकाने केले.


श्री. ओक साहेब दूरवर एका शिलाखंडावरून पाहणी करित अंदाज घेताना दिसले. तेथवर जावून त्यांस सांगेपर्यंत बहुधा भरतीची वेळ जवळ येईल असे वाटून मी लांबुनच त्यांसाठी शब्द घोषणा करून, मत्स्योपजीवींनी पुरविलेली माहिती त्यांस सांगितली. त्याप्रमाणे दिशा बदलून ते पलिकडल्या बाजूस चालू लागले; चालता चालता वाळूच्या डोंगरापलिकडे दिसेनासेही झाले. मी आहे त्याच ठिकाणी उभा राहून विचार करू लागलो, आणि स्वत:च्या मनाशीच दिवसभराचा लेखाजोखा मांडता मांडता घरी पोहोचावयाची घाई झालेल्या कृद्ध वाहनचालकाची आठवण झाली. घड्याळाकडे पाहिले, आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला! विचारमग्नावस्थेमध्ये रात्रीचे १२:३० वाजून गेल्याचेही कळू नये? मी स्वत:वर वैतागलो.

 

इकडे तिकडे पाहता कोणीही दिसेना. अधून मधून कानावर आदळणार्‍या समुद्रलहरींच्या गूढ घनगंभीर गाजांच्या आवाजामध्ये तेथील भीषण शांतता अधिकच भयावह वाटू लागली. पौर्णिमेचा चंद्र सोडला तर त्या अंधारात प्रकाशाचे दुसरे साधन असे काही नव्हते. त्यामुळे त्या वातावरणाची गूढता आणि भीषणता वाढून भीतिने कापरेंच भरू लागले. श्री. ओक साहेब कोठेही दिसेनासे झाल्यामुळे मी त्यांच्या नावाने मोठमोठ्याने साद घालू लागलो. थोड्या वेळापूर्वी ज्या वाळूच्या डोंगरापलिकडे ते निघाले होते, त्या दिशेने अंदाज घेत मीही हळूहळू निघालो. त्यांच्या नांवाने हाकारणें चालूच होते. बहुधा माझ्या हाकांचा आवाज दूरवर वाहनचालकापर्यंत गेला असावा. त्याने तातडीने बॅरिकेड्सची हालवाहालवी करून वाहन घेवून मी थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी उभा होतो तेथवर घेवून आला. तेथे वाहन लावून पळत माझ्याकडे येत मोठमोठ्याने आरडाओरडा करित मला विचारू लागला, "काय झाले वकीलसाहेब? कां ओरडतांय? तुमच्या सोबतचे साहेब कोठे आहेत?" आधीच तो भडकलेला, त्यातून ही बिकट परिस्थिती त्यास काही सहन होईना...


पुढे काय घडले ते टॅक्सी ड्रायव्हरच्या शब्दांत....


मुंबईचा वकील त्या आर्मीवाल्यांच्या नावानं जोरजोरानं ओरडत होता, त्याचा आवाज ऐकू आला. वकील एकटाच होता. आर्मीवालं कुठं दिसंनात. काय झालं कळंना. मीही घाबारलो. हातातली सिगारेट पायानं चेचली अन् बॅरीकेड्स हालवून तिकडं गाडी पळवत गेलो. वाळूत गाडी पुढं सरकंना.. मग एका ठिकाणी लावली अन् पुढे पळत गेलो. वकील रडकुंडीला आलेला दिसला. आर्मीवाले आंघोळीला समुद्रात उतरलेत म्हणं. कुठं दिसंनात म्हणं. ऐकून माझं टकुरं सटकलं.. मी वकीलावर ओराडलोच... “अरे बिनडोका... तुम्ही लोक एवढे शिकले सवरलेले.. कसल्या डोंबलाच्या आंघोळी करताय समुद्रात?.. मी तुला आधीच बोललो होतो नां.. समुद्रात उतरू नका म्हणून.. नुसतं समुद्राचं पाणी हातानं डोक्यावर घ्या म्हणून? अन् तू त्या आर्मीवाल्याला एकट्याने का जाऊ दिलेस? ते कुणीकडं गेलेत हेही तुला ठाऊक नाही? असे कसे मित्र तुम्ही? मगाशी मंदिरात हारवलात, आता इथं हारवताय... काय म्हणावं तुम्हाला? रात्रीचे बारा वाजून गेलेत, मूर्खा... काही उलटंसुलटं झालं... आर्मीवाला बुडाला, तर पोलिस केस होईल..!!" म्हणता म्हणता माझे अवसान गळाले आणि मला रडूच फुटले.


“गप्प बस् जरा! रडतोस काय असा बावळटासारखा?..” वकील मोठ्याने ओरडला. मीही ओरडलो... “तुझं काय जातंय... तू तर स्वत:च वकील. तू मलाच गुंतवणार. मीच तुमच्यासोबत इथं रात्री येण्याचा मूर्खपणा केला. अरेऽऽ देवाऽऽ...” मी रडवेला झालो होतो. अचानक दुरून अनेक लोकांच्या आवाजाचा एकच गिलका ऐकू आला अन् आम्ही दोघे एकदम गप्प झालो. त्या दिशेने पाहू लागलो. काही लोक समुद्रकिनार्‍याजवळ होड्या बांधून ठेवतात त्या जागेजवळ एकत्र जमून एका शिडीवर काहीतरी ओझे उचलताना दिसले आणि छातीमध्ये एकदम धाकधूक झाले. “काय हो, वकीलसाहेब... आर्मीवाल्यांनाच बाहेर काढताहेत की काय?” मी वकिलाला म्हणू लागलो, पण पाहिले तर वकील बाजूला नव्हताच. तो केंव्हाच त्या दिशेनं झपाझप चालू लागला होता. मीही त्याच्या मागं धावलो. तितक्या थंडीतही जोरदार घाम फुटला होता. अंग सगळे थरथरत होते. डोके गरगरू लागले होते. पाय कापत होते.. तरीही जोरात जोर आणून पळालो.


तिथं पोहोचून पाहतो तर तिथं आर्मीवाले नव्हतेच..! नावाडी लोक होते. ते आम्हाला पाहून बिचकले. तरीही वकीलानं त्यांना विचारलं.. कोणी माणूस कुठं दिसला का जवळपास म्हणून.. नावाड्यांच्या पैकी एकजण म्हणाला.. “हां.. एक माणूस तिकडं स्मशानाच्या बाजूला गुडघाभर पाण्यात उतरलेला आम्ही पाहिला मघाशीच..” पुढं “कुठाय स्मशान” असं विचारून वकील त्या दिशेनं आर्मीवाल्याला बघत त्यांच्या नावानं हाका टाकत झपाझप निघाला. वकीलाकडं पाहून आतापर्यंत माझ्या धीरात थोडा धीर आलेला होताच.. एका बांधाच्या काठानं तारेचं कुंपण ओलांडून आम्ही एका पाणथळापाशी आलो. वकील ओरडत होताच. त्याच्या हाकेला आर्मीवाल्याचा कुठूनतरी जवाब आला.. ते दोघं एकमेकात ओरडत ओरडत काहीतरी बोलले. मला त्यांची भाषा कळली नाही, तरी आर्मीवाल्याचा आवाज ओळखू आला अन् एकदम सुटल्यासारखं वाटलं...


समारोप:


नाडीग्रंथ वाचन जितके थरारक तितकेच त्या लिखाणातून निर्माण झालेल्या घटना घडताना पडलेले कष्ट व लेखनही थरारक... त्या दिवशी... जरा गफलत घडली तर..