कूटलिपी म्हणजे काय? एक विचार.
१. पूर्वपीठिका
आपले मान्यवर सदस्य श्री. समित्पाणी शरद सर ह्यांनी श्री. जेम्स प्रिन्सेप ह्याच्या भारतीय लिपीसंशोधनकार्याबद्दल माहिती देणारा एक लेख लिहिला होता, त्यामध्ये 'देवानां प्रिय, प्रियदर्शिन राज्ञा लिखा' नामक प्रसिद्ध वाक्याचा एक संदर्भ आला होता, त्या लेखावर माझ्याकडूनही काही भाष्यही केले गेले होते. ह्या निमित्ताने श्री. समित्पाणी शरद सरांनी एक-दोनदा 'गुप्त लिपींवर लेख लिहा' असे मला सुचविले होते, तथापि ह्या ना त्या कारणाने ते सहजशक्य झाले नाही. भारतातील गुप्त राजांच्या कार्यकाळात प्रचलित असलेल्या 'गुप्त - कुटिल - कूट' नामक लिपींवर ही चर्चा नव्हे. मध्यंतरी उपक्रमावर झालेल्या नाडिग्रंथ चिकित्साविषयक चर्चेमुळे ह्या नाडिग्रंथातील लिपीबाबत माझी स्वत:ची जिज्ञासा जागृत होवून लिपीशास्त्राभ्यासासाठी एक जिज्ञासा म्हणून त्यातील लिपीबद्दल जो शोध घेतला त्याबद्दल एक विचार मांडणे हा ह्या लेखनाचा उद्देश आहे.
२. विविध स्त्रोत
एक जिज्ञासा म्हणून शोध घेताना नाडिपट्टींची आंतरजालावरील काही चित्रे अभ्यासिली. तेवढ्यानेच काम भागणार नव्हते, त्यामुळे काही स्नेह्यांच्या ओळखीने मुंबईतील काही नाडिवाचकांशी चर्चा करण्याचा योग आला. ही नाडिवाचक मंडळी रूढार्थाने - लौकिकार्थाने थोडी कमी शिकलेली असतात असे प्रथमदर्शनीच लक्षात आले, त्यामुळे त्यामधील लिपीसंबंधी ते स्वत: काही शास्त्रीय माहिती देवू शकतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे हे ध्यानात आले. तथापि मी स्वत: तमिळभाषकही असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधणे सुलभ झाले. अधिवक्ता ह्या नात्याने एकदा नाडिवाचकांचा विश्वास प्राप्त करून घेतल्यानंतर पुढे अनेक वेळा लिपीसंबंधी चर्चा करण्याचा योग आला. 'नाडिवाचक म्हणून कार्य करण्याआधी आम्ही स्वत: ही लिपी आणि जुनी भाषा काही वर्षे परिश्रम घेवून शिकतो' असे प्रतिपादन त्यांनी केले तेंव्हा 'नाडिपट्टींमध्ये मुळात काहीही लिहिलेलेच नसते' असा तीव्र आक्षेप मी नोंदविला. ह्यावर त्यांनीही हिरीरीने वाद केला आणि पुरावा म्हणून काही पट्टी दाखविल्या. ह्या योगाने पुढे त्यांच्याकडे अनेक पट्टी बघण्याचा आणि हाताळण्याचा योगही आला. त्याचप्रमाणे त्यांच्या मदतीने मुंबईतील इतरही काही नाडिवाचकांकडे चर्चा करण्याचा योग आला. त्या चर्चांमध्ये साधारणत: जे दृष्टीपथास आले, ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे केलेला आहे.
३. विचाराची पद्धति आणि लिपीबाबत प्रथमदर्शनी जे लक्षात येते ते :
नाडिग्रंथ-नाडिपट्टी ह्या विषयातील लिपीबाबत अभ्यास करताना त्यातील नाडिभविष्य ह्य भागाकडे सहज दुर्लक्ष करतां येते. लिपीबाबत विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नाही. 'भविष्य' ह्या शब्दास सर्वस्वी दूर ठेवून अशा वस्तुनिष्ठ पद्धतीने केवळ लिपीचा अभ्यास करताना प्रथमदर्शनी असे लक्षात आले की ही हस्तलिखिते मुख्यत्त्वेकरून 'वट्टेळुत्तु' नामक लिपीमध्ये लिहिलेली आढळतात. 'वट्टेळुत्तु' ह्या तमिळ शब्दाचा मराठी अर्थ 'वर्तुलाकृती लेखन' असा होतो. ही लिपी म्हणजे तमिळ लिपीचेच पुरातन स्वरूप असून ती शीघ्रलेखनासाठी सुलभ आहे. ज्या 'वट्टेळुत्तु' ला मराठीभाषेत 'कूटलिपी' असे म्हटले जाते आहे, तिच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होतानाच्या ग्रंथलिपीचा प्रभाव आढळून येतो.
४. ग्रंथलिपी म्हणजे काय :
ही ग्रंथलिपि (तमिळ भाषेत: கிரந்த ௭ழுத்து) दक्षिण भारतात पुरातनकाळापासून (क्रिस्तपूर्व ६०० पासून) विविध रूपांत प्रचलित असलेली अशी एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण लिपी आहे. सामान्यत: हिची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली असल्याचे विद्वानांचे सर्वमान्य मत आहे. आधुनिक काळातील सर्व दक्षिण भारतीय भाषांच्या स्वतंत्र लिपींवर तसेच सिंहल लिपी, पल्लव लिपी, मोन लिपि, जावा लिपी, ख्मेर लिपी ह्या आणि अशा अनेक लिपींवर ह्या ग्रंथलिपीचा बराच सखोल प्रभाव दिसून येतो. ह्या अनेक लिपींचा उगम हा ग्रंथलिपीमध्येच आहे असेही लिपीशास्त्राभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.
५. ग्रंथलिपीचा उपयोग काय कारणाकरिता झाला आणि तिच्या भिन्न रुपांचा विचार :
दक्षिण भारतामध्ये संस्कृत भाषेतील साहित्यलेखन करण्यासाठी देवनगारी लिपीचा उपयोग होण्यापूर्वी ग्रंथलिपीचा उपयोग होत असे. दक्षिण आशियाई तमिळभाषी क्षेत्रांमध्ये जवळजवळ १९ व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेत साहित्यलेखन करण्यासाठी ग्रंथलिपीचा उपयोग होत आलेला आहे. उदाहरणार्थ : श्रीमद्भगवद्गीतेचे तमिळभाषेतील संस्करण - ह्यात संस्कृत श्लोक ग्रंथलिपीत आढळतील, तर त्यांचे तमिळभाषेतील निरूपण तमिळ लिपीमध्ये आढळेल. असे दोन लिपींमध्ये मुद्रित केलेले ग्रंथ प्रस्तुत लेखकाच्या पाहाण्यात आलेले आहेत.
इंग्रज अभ्यासकांनी मुद्रणकार्यासाठी म्हणून ग्रंथलिपीचे छाप सिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, परंतु असे करताना त्यांनी केलेल्या छापास एक प्रकारचे प्रामाण्य येवून तिची इतर काही प्रचलित रूपे सामान्यजनांच्या विस्मृतीमध्ये गेली. ग्रंथलिपीची भिन्नभिन्न अशी काही रूपे आहेत. ही भिन्नरूपे साधारणत: दोन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहेत.
आकृती:
सुदैवाने ह्यापैकी अनेक रूपे आपणास दक्षिणभारतातील मंदिरांमध्ये भित्तीलेखनाच्या स्वरूपात आजही आढळतात. मैसूरु विश्वविद्यानिलय प्राच्यविद्यासंशोधनालयाने ग्रंथलिपीवर बरेच संशोधन केलेले आहे. प्राच्यविद्यासंशोधनालयाने काही दशकांपूर्वी ग्रंथलिपीचा विकास होतानाची जी अनेक रूपे आहेत तिचा एक तौलनिकदृष्ट्या अभ्यास विस्तृत निबंधरूपाने उपलब्ध करून दिला होता. ही सारी रूपे प्रथमदर्शनी एकमेकांपासून भिन्न जरी दिसत असली, तरीही सर्वसामान्यपणे ह्यास ग्रंथलिपी हेच संबोधन आहे. (जसे देवनागरी लिपीचीही विकसनकालातील अनेक विविध रूपे असूनदेखील सर्वसामान्यपणे त्यांना 'देवनागरी लिपी' असेच वर्गीकृत केले जाते.)
६. नाडीपट्टींमध्ये आढळणारी लेखनशैली :
नाडीपट्टींमध्ये आढळणारी ग्रंथलिपीची स्वत:ची विशिष्ट अशी एक शैली आहे. मूळ ग्रंथलिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे तीन मजली लिपी आहे, तर नाडीपट्टीमध्ये ती दोन मजली असल्याचे आढळते. ह्याचे कारण शीघ्रलेखन सुलभ व्हावे असे आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शीघ्रगतीने लेखन करणे सुलभ व्हावे म्हणून बाळबोध लिपीची अक्षरे हात न उचलता लिहिली जात असत (मोडी लिपी) त्याचप्रमाणे नाडिपट्टींमधील लेखन शीघ्रगतीने व्हावे याकरिता हात न उचलता ग्रंथ लिपीत लिहिण्याची शैली विकसीत केली गेली आहे. असे करत असताना मात्र मूळ ग्रंथलिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, त्यामुळे सामान्य अभ्यासकास ही लिपी प्रथमदर्शनी ग्रंथलिपी न वाटण्याचा संभव आहे. हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमुळे ही लिपी थोडी दुर्बोध होते. अभ्यासकास ही लिपी ग्रंथलिपी न वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रंथलिपीचे प्रमाणीकरण होण्यापूर्वीची भिन्नरूपे जी त्यांच्याशी परिचय नसणे हे होय.
ह्या प्रकारची लिपी केवळ नाडीपट्टींमध्येच आढळत नसून इतरत्रही आढळते. प्रस्तुत लेखकाच्या पाहाण्यात हितोपदेश, सिद्धऔषधयोजना इ.इ. ग्रंथांची ग्रंथलिपीमध्ये लेखन केलेली हस्तलिखिते आलेली आहेत, त्यातही अशाच प्रकारच्या लिपीचा उपयोग केला गेल्याचे दिसते. महाराष्ट्रातील श्री. एल. एस. वाकणकर तथा श्री. ए. बी. वालावलकर इत्यादि लिपीशास्त्राभ्यासकांनीही अशा हस्तलिखितांचा अभ्यास केल्याचे लिहून ठेवले आहे. 'शीघ्रलेखन सुलभ व्हावे ह्यासाठी लिपीमध्ये बदल करण्यात येतात' हे त्यांचे विस्तृत अभ्यासांतीचे मत आहे, आणि लिपीशास्त्राभ्यासकांचे अशा लेखनाबाबतीत हेच प्रतिपादन असते.
७. हस्ताक्षरवाचनकौशल्य :
नाडिग्रंथ हे हस्तलिखित स्वरूपात असल्याकारणाने अभ्यासकाचे केवळ लिपीचा अभ्यास असून भागणार नाही तर विविध प्रकारची हस्ताक्षरे वाचनाचा सराव असणे आवश्यक आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे शीघ्रलेखनात लिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, ते बदलले जाण्यास शीघ्रगतीने केलेले लेखन हे एक प्राथमिक कारण असून दुसरे कारण म्हणजे असे लेखन हे विविध व्यक्तिंकडून केले गेलेले असणे हे होय. व्यक्तिगणिक आघात बदलतांत आणि त्यामुळे बारकाईने वाचन करणे हे अक्षरे लागण्यासाठी आवश्यक ठरते. महाराष्ट्रीय वाचकांस हा विचार उमगणे कठिण खचितच नसावे, ह्याचे कारण असे की महाराष्ट्रात मोडी लिपीचा अभ्यास असणारे अनेक अभ्यासक आहेत, आणि ह्याबाबतीत त्यांचे मतही हेच आहे. ह्या प्रकारचे लेखन वाचण्यासाठी प्रथमदर्शनी दुर्बोध जरी वाटत असले तरी ते वाचणे अशक्यप्राय निश्चितच नसते.
८. कूटलिपी कां म्हणतांत? शब्दार्थ :
असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी न म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम 'कूटलिपी' ह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. ह्या लिपीला 'कूटलिपी' असे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे. (नाडिवाचक स्वत: त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्ये 'कूट' म्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत. ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा विचित्रार्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे. परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही. आपल्या येथील एका अ-तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट न घेता वाचता आलेली आहेत. तरीही ही लिपी कूट (सांकेतिक) असावी काय?
९. कूट्टेळुत्तु आणि युक्ताक्षरे ही संकल्पना :
हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 'कूट्टेळुत्तु' ह्या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. ह्यासाठी लिपीशास्त्रातील 'युक्ताक्षर' ह्या संकल्पनेची उजळणी करावी. 'युक्ताक्षर' हा संस्कृतभाषी शब्द आहे. मराठीभाषेमध्ये ह्या शब्दास 'जोडाक्षर' म्हणतात. देवनागरी लिपी आणि इतर तीसदृश लिपींमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली गेली म्हणजे त्या अक्षरांतून नवीन युक्तचिह्नाक्षरे सिद्ध होतात. ही युक्तचिह्नाक्षरे बरीचशी मूळ अक्षरासारखी दिसणारी परंतु मूळ अक्षरापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी असतात. ह्या अक्षरांनाच सामान्यपणे युक्ताक्षरे असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ: श्री = श् + र् + ई = असे न लिहिता, 'श्री' असे लिहिले जाते. 'श्री' हे युक्ताक्षर होय. लिपीशास्त्राभ्यासकांचे एक आवडते उदाहरण द्यावयाचे झाल्यास, संस्कृत शब्द 'कार्त्स्न्यम्' ह्याची रचना क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म् अशी असून, तो 'का र्त्स्न्य म्' असा लिहिला जातो. ह्यात 'र्त्स्न्य' हे युक्ताक्षर आहे.
१०. नाडीग्रंथांच्या संदर्भातील युक्ताक्षर ह्या संकल्पनेचे स्थान काय? :
नाडिग्रंथ-नाडिपट्टी आणि नाडिभविष्य ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? कारण नाडिग्रंथामध्ये जे तथाकथित भविष्यकथन लिखितस्वरूपामध्ये उपलब्ध आहे असे सांगितले जाते, ते तर तमिळभाषेमध्ये आहे. आणि तमिळभाषेमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही! तमिळ लिपीमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली जातच नाहीत, त्यामुळे युक्तचिह्नाक्षरे - थोडक्यात युक्ताक्षरे - सिद्ध होत नाहीत.
उदाहरण: वर दिलेला 'कार्त्स्न्यम्' हाच शब्द तमिळ लिपीमध्ये लिहायचा झाल्यास க் + ஆ + ர் + த் + ஸ் + ன் + ய் + அ + ம் (क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म्) अशी फोड असली तरीही तो கார்த்ஸ்ன்யம் असाच लिहिला जाईल. ह्याचे कारण असे, की आधुनिक तमिळ लिपीमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही. अक्षरे एकास एक जोडून लिहिली न जाता, एकासमोर एक लिहिली जातात. ज्या अक्षरांचा हलन्त उच्चार असेल, त्यांच्या डोक्यावर 'पुळ्ळि' (बिन्दु) देऊन त्यांचे अपूर्णत्त्व स्पष्ट केले जाते.
ह्याच युक्ताक्षरांना तमिळभाषेत 'कूट्टेळुत्तु' असे म्हणतांत. ह्या शब्दात 'कूड' आणि 'एळुत्तल' असे धातु आहेत. 'कूड' म्हणजे 'सह' तर 'कूट्टम' म्हणजे 'संघ'. 'एळुत्तल' म्हणजे 'लेखन' किंवा 'लिहिणे'. कूडऽ एळुदिनदु ஃ कूट्टेळुत्तु = एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असा एकूण अर्थ आहे.
परंतु मुळात तमिळ लिपीमध्ये जोडाक्षरेच नसताना, 'कूट्टेळुत्तु' हा शब्द नाडीग्रंथांच्या लेखनाबाबत काय म्हणून उपयोजिला जातो आहे? ते लेखनदेखील ग्रंथलिपीमध्ये आहे, तर ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? ह्याचे कारण असे की कूट्टेळुत्तु ह्या शब्दाचा 'जोडाक्षरे' असा एकमेव अर्थ नसून एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असाही अर्थ होतो. नाडीग्रंथांच्या लेखनाबाबतीत बोलावयाचे झाल्यास ह्यातील ग्रंथलिपी ही बरीचशी मोडी लिपीसारखी हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमध्ये (पक्षी : एकत्रितरीतिने, सोबत लिहिलेली, एकसारखी अशी) असल्यामुळे 'कूट्टेळुत्तु' असा शब्द तिच्याबाबतीत उपयोजिला जातो. ती लिपी सांकेतिक आहे म्हणून नव्हे!
११. तात्पर्य :
'कूडऽ एळुदिनदु' म्हणजे एकत्रितरीतिने लिहिले गेलेले असे हे लेखन. हे लेखन ग्रंथलिपीमध्ये 'ग्रथित' करून ठेवलेले असते, म्हणून ग्रंथ हा शब्द : नाडिग्रंथ.
१२. पुढील संशोधनाची आवश्यकता :
नाडिग्रंथ-नाडिपट्टीआधारे भविष्यकथन करण्याच्या प्रकारामध्ये "जातकाकडूनच विविध मार्गांनी माहिती काढून, आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन, तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो" असा एक संशय नेहमी घेतला जातो. ह्या संशयाचे निराकरण करण्याकरता लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्यता काय आहे हे स्पष्ट होऊन निष्कर्षास येता येईल.
खरे पाहता हा सारा विषय समाजाशी संबंधीत असल्याकारणे ह्या विषयावर केवळ वैयक्तिक जिज्ञासापूर्तीसाठी अथवा वैयक्तिक चिकित्सापूर्तीसाठी अभ्यास न होता शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह त्यातील 'ज्योतिष' किंवा 'भविष्य' हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ ह्या अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे.
हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.
- हैयो हैयैयो!
लेखक मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. वैद्यकीय न्यायशास्त्राची आवड. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्यातत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्या तत्त्वाचा खंदा समर्थक. विविध भाषांचेभाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांचा अभ्यास. डिसेंबर २००९ मध्ये तुळुभाषेसाठी स्वनिर्मित नवी लिपी सादरकरणार. द्राविडभाषाकुलातील भाषांच्या व्याकरणाचा मुळातून अभ्यास. मराठीभाषेच्या व्याकरणाचाही अभ्यास. श्री. विश्वनाथ खैरे ह्यांनी मांडलेल्या संमत सिद्धांताचा पुरस्कर्ता. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर तमिळ - इंग्रजीइत्यादि भाषांमधून लेखन. भविष्यकालात मराठीभाषेतून लेखन करण्याची इच्छा.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा