28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.
लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत
संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक
काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे 1पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे. पहिली आवृत्ती - जानेवारी १८८३, मूल्य ३० रुपये.) त्यातील ‘नवे गाव’ शीर्षकाचा एक लेख 'साप्ताहिक तेजस्वी'मधे सन १९७०च्या सुमाराला प्रसिद्ध झाला होता. त्याच्या शेवटी त्यांनी टिप्पणी केली होती
‘... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे. लोकांना भेटून, बोलून, प्रत्यक्ष स्थिती डोळ्यांनी पाहून आजच्या खेड्याचे चित्र रेखाटले पाहिजे....’
मनात आले की आपण जर लोणीकंद गावाजवळ राहतो. तर निदान त्या गावाचा सन १८२० सालानंतरच्या १९० वर्षात काय व कसा कायापालट झाला आहे याची नोंद का करु नये? त्याप्रमाणे माझ्या अन्य कामातून सवड काढून मी दि. ९ ऑगस्ट २००९ ला, दुपारी ३ वाजता स्कूटरवरून एकटाच निघालो. विमाननगरहून १५ -१६ किमी गेल्यावर लोणीकंद ० असा अंतर दर्शक दगड आला. त्याआधी वेकफील्ड फूड प्रॉडक्ट्स कंपनीचा भला मोठा कारखाना बदलत्या काळाची चुणुक देऊन गेला. नंतरच्य़ा दोन तासात गावातील काही स्थळांना, लोकांना भेटलो. मिळवलेली माहिती माडगुळकरांनी मांडलेल्या विचारांचा मान राखत कशी सादर करावी असे विचार परतताना येत होतो. त्याचा हा छोटेखानी वृतांत.
कै. व्यंकटेश माडगुळकांनी एकाबाजूला लोणीकंद या प्रातिनिधिक खेड्यातील सर्जन कोट्ससाहेबाच्या2 सन १८२० मधील वृतांतामधील काही उतारे देऊन त्यांनी त्यांच्या बालपणातील (सन १९३०-४०) पाहिलेल्या अनुभवलेल्या खेड्यांतील जनजीवनाचा उल्लेख करून तोपर्यंतच्या १००-११० वर्षांत फारसा फरक पडला नसल्याची नोंद केली आहे. शिवाय ते म्हणतात की सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ श्री. धुर्ये ह्यांनी कोट्स नंतर १२५ वर्षांनी ‘लोणीकंद – देन एँड नाऊ’ असा वृतांत प्रसिद्ध केला होता. त्यात त्यावेळी कोट्स साहेबाच्या कथनातील काही गोष्टीत काय व कसा फरक झाला होता यांची नोंद केली होती. थोडक्यात श्री धुर्यें3 यांच्या नंतर हे काम कमांडरनी4 हाती घेतले होते. असो.
माडगूळकर आपल्या नवे गाव लेखात म्हणतात, 'ह्या वृतांतात सर्जन कोट्ससाहेबांनी गावची लोकसंख्या, गावचा कारभार, जाती-जमाती, आर्थिक स्थिती, व्यापार उदीम, शेती, लोकांची राहणी, कपडे, जेवणखाण, ह्या संबंधी सर्व लहानसान तपशील दिले आहेत. बाराबलुतेदारांची बरीच कामे कोट्ससाहेबांनी दिली आहेत त्यापैकी काही विशेष निवडक अशी मी घेतली आहेत.'
‘सुतार, लग्नप्रसंगी नवरानवरीला बसवून आंघोळ घालण्यासाठी चौरंग पुरवतो. तंबू ठोकण्यासाठी व घोडे बांधण्यासाठी खुंट्या पुरवतो.’
‘लोहार, बगाडाचे काम करतो. हे काम म्हणजे भैरोबा व हनुमानाच्या मुर्तीसमोर घुमणाऱ्या भक्तांच्या पाठीच्या कातडीतून लोखंडी आकडा घालणे होय.’
‘धोबी, लग्नामधे, मिरवणुकीच्या वेळी नवरानवरींसमोर पायघड्या अंथरतो. ’
‘न्हावी, सुटीच्या दिवशी पाटील आणि कुलकर्णी ह्यांचे मालिश आणि चंपी करतो. लग्नाच्या वेळी वाजंत्री वाजवतो. पेरणीच्या दिवसात बैलाच्या शेपट्या कातरतो. त्याबद्दल त्याला धान्य मिळते.’
‘सोनार, कर भरले जातात तेंव्हा नाणी चांगली आहेत, का नाहीत हे पहातो. त्याच्याकडून सोन्याचांदीचे काम करवून घेतले जाते. तेव्हा त्याला दोन पैशांपासून एक रुपयापर्यंत मजुरी मिळते.’
‘मांग, तरुण बैलांचे वृषण बडवतो. देहांताची शिक्षा झालेल्यांना मारण्याचे काम करतो.’
‘महाराचे, काम म्हणजे गावच्या सीमेवर व एकून गावाच्या कारभारामध्ये आक्रमण न होऊ देणे. त्यांना सीमांचे अगदी बारीक ज्ञान असते. सीमेच्या भांडणात त्याची जबानी निर्णयात्मक समजली जाते. वेशीचे दरवाजे उघडण्याचे व बंद करण्याचे काम त्याच्याकडे असते. ’
‘रामोशी, जमातीबद्दल सांगताना कोट्स लिहितात, त्यांचे डोळे व कान जनावरांप्रमाणे तीक्ष्ण असतात. माणसाचा व जनावरांचा माग ते इतका बरोबर काढतात, की आपला विश्वास बसणार नाही. एकदा शब्द दिल्यावर ते तो पाळतात.’
‘मुसलनामान, उर्मट व दांडगे वाटतात. त्यांची अतिद्वेषार्ह असहिष्णुता आणि हटवादी तत्वामुळे ते त्यांच्या मुर्तीपूजक शेजाऱ्यांच्या धार्मिक विधींचा तिरस्कार व निर्भत्सना करतात. गावामध्ये मुसलमानांची एक मशिद आहे. तिथे ते कुठल्याही अडथळ्याशिवाय सर्व धार्मिक विधि पार पाडतात.’
‘गावात गुलामांची, आठ कुटुंबे असून माणसांची संख्या अठरा आहे. त्यांना शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विकतात. विशेषतः चांगल्या नसणाऱ्या मुलींना ब्राह्मण लोक घरातील कामे करण्यासाठी विकत घेतात. ’
‘माडगुळकर आपल्या अनुभवाची त्यात भर घालताना म्हणतात, जवळजवळ लोणी एवढीच लोकसंख्या आणि आकार असलेल्या महाराष्ट्रातील खेड्य़ात माझा जन्म झाला. कोट्स ह्यांनी लिहिलेला सर्व वृतांत वाचल्यावर माझ्या असे लक्षात आले की एकोणिसशे सदतीस साली मी जे खेडे पाहिले आहे, ते विशेष बदललेले नव्हते.
त्यांच्या आठवणी प्रमाणे त्यांच्या गावाला दोन पाटील होते. कुलकर्णी होता. शाळा मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत होती. मास्तर एकच होते. शाळेत फक्त एकच ब्राह्मणाची मुलगी होती. गावात आठ ब्राह्मणाची घरे होती. दोन मोमिनाची होती. एक मराठ्याचे होते. बाकी सर्व येलमार होते. त्यांची जात फक्त आठ गावात आहे असे ते सांगत. सर्वच यलमार गळ्यात लिंग घालत नसत. रामोशी, महार, मांग, होलार यांची संख्या बरीच होती. सुताराचे व गवंड्याचे काम एक महारच करीत असे. शिवाय एक घर परटाचे होते. दोन न्हाव्यांची होती. एक सोनाराचे होते. एक कासाराचे होते. आमच्या गावाला वाणी नव्हता, पण शेजारच्या गावातील वाण्याने काही वर्षांनी गावात दुकान टाकले. शिंपी नव्हताच.’
गावात वाण्य़ाचे दुकान आले. हा वाणी पैशाबदली काहीही घेई. कोणतेही ध्यान्य, वैरणीची पेंडी, बाभळीचा डिंक, करंजीच्या बिया, असे काहीही त्याला घालून गूळ, तेल, मीठ, जिरे, मिरे, असा माल विकत घेता येत असे.
माडगुळकारांच्या लहानपणी बलुत्याची पद्धत चालू होती. न्हावी हजामत करी. आणि ताजी भाकरी घेऊन जाई. परीट कपडे धूत असे. होलार पायताण सांधण्याचे काम करी. महार जळणाचे लाकूड फोडून, त्याबदली भाकरी-कालवण घेऊन जाई. रामोशी रोज संध्याकाळी भाकरी मागे आणि त्या बदली चोरीस गेलेलेल्या वस्तूंचा तपास लावून देई. ज्याच्याकडे बागाईत जमिनी असत त्याच्याकडे जाऊन बलुतेदार मंडळी रताळे, गाजरे, मिरची, वांगी, कांदे असले 'माळवे' खाण्यासाठी मागून आणत. सुगी संपल्यावर, खळ्याच्या वेळी ह्या सगळ्यांना धान्याची पेंढी मिळे.
शेतीची जमीन, ती कसण्याची पद्धती, अवजारे, शेतकऱ्याजवळ असणारी जनावरे ह्यांविषयी ही बारीकसारीक माहिती देऊन साहेबमजकुरांनी त्याकाळी असलेल्या धान्याच्या किंमतीही दिल्या आहेत. गहू रुपयाला बारा शेर, हरभरा रुपयाला सोळा शेर, ज्वारी रुपयास अठरा शेर (स्वस्त झाली तर पंचवीस शेर), नाचणी रुपयास तीस शेर. तांदूळ रुपयास दहा शेर.
धान्य दळण्यासाठी, भरडण्यासाठी दगडी जाती होती. पाण्यासाठी मातीचे रांजण होते. पीठ मळण्यासाठी लाकडी काथवटी म्हणजे पराती होत्या. ( ह्या लाकडी परातीची किंमत कोट्सनी दहा पैसे दिली आहे.) उखळ होते. मुसळ होते. मडकी होती, त्यांच्या उतरंडीही घातल्या जात होत्या. धान्य ठेवण्यासाठी टोपल्या, कणग्या होत्या. लाकडाच्या ठाणवईवर ठेवलेले लोखंडी दिवे होते.गावोगावी जत्रा आणि होळी, दसरा, दिवाळी आणि पोळा (आमच्याकडे बेंदूर ) हे सण शंभर वर्षापुर्वी साजरे होत, तशाच पद्धतीने साजरे होताना मी पाहिले आहेत. होळीसाठी मिळेल त्या ठिकाणाहून लाकडे चोरणे, होळीला पोळी देण्याचा मान पाटलांचा असणे, नंतर रात्रभर तमाशा होणे, सोंगे निघणे हे सगळे होत होते. धुळवडीला चिखलफेक होत होती. कुस्त्या होत होत्या.
दसऱ्याला नवीन कपडे घालून आणि फेट्यात नव्या धान्याचे तुरे खोवून वाजतगाजत सीमोल्लंघन होई. शस्त्रपुजा, होत होती. आपट्याच्या झाडाची पुजा होत होती. सोने लुटले जात होते. फक्त कोट्सनी लिहिल्यापैकी मेंढ्याचा बळी मात्र नव्हता.
पोळ्याचा सणही दणक्यात होत होता. बैलांची शिंगे बेगडाने रंगवून त्यांच्या टोकाला गोंडे बांधले जात. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जात. बैलांना पक्वान्ने चारुन त्यांची पूजा होई. मालक त्याच्या पाया पडत. संध्याकाळी सगळे बैल मिरवणुकीने हनुमानाच्या देवळाकडे निघत. पाटलांचे बैल सर्वात पुढे असत. दुसऱ्या दिवशी गाव शिकारीला जाई., कडक उन्हाच्या वेळी शिकारी रानात दूरदूर विखरत. ससे, हरीण, डुक्कर असे जनावर उठले की त्याचा ताणपट्टा काढत. ते धाऊन थकल्यावर त्याला सोट्याने मारत. ही शिकार वाजत गाजत गावात येई. शिकारीचे मुंडके वेशीत पुरले जाई. शेपुट वेशीतल्या झाडाला टांगले जाई आणि मासांतील वाटा घरोघर पोचता होई.
शेतकऱ्याला होणाऱ्या रोगराईबद्दल ही कोट्सनी लिहिले आहे. त्यात नारु आहे. गावचा न्हावी शस्त्रवैद्यकी करत असे. पायांना झालेली कुरुपे कापून घेणे, रुतलेला काटा काढून घेणे, ही कामे त्याच्याकडून केली जात. बायका अंधाऱ्या खिडकी नसलेल्या जागेत बाळंत होत. आतील, नीट हवा नसलेल्या जागी दिवा जळत असे. शेगड्या धगधगत असत. 'बाळ-बाळंतीण सुखरूप' हे नेहमीच ऐकायला मिळत नसे.
. लोणीकंद गावची एकूण लागवडी खालील जमीन दोन हजार आठशे एक्क्यांशी एकर आणि तीस साखळ्या असून जमीन महसूल एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये आठ आणे आहे. एकूण घरे एकशे शहाऐंशी आणि लोकसंख्या नऊशे चोपन्न आहे अशी माहिती वृत्तान्तात आहे. कोट्स म्हणतात, 'लोणी गावच्या भैरोबा देवाची साप चावलेल्या माणसांना आणि जनावरांना बरे करण्याबद्दल ख्याती आहे. मारुतीचे देऊळ चावडी समोर आहे. त्यापाशी गावसीमा दाखवणारा 'गडधू' गोल दगडीगोटा होता.'
कोट्सनी पोषाखाचे वर्णन करताना म्हटले होते, कमरेवर नाडीने बांधलेली आणि गुडघ्यापाशी मोकळी असलेली विजार घालणारे लोकही गावात होते. काही जण बाराबंद्याही वापरत. 'कांबळे आणि धोतर' यांचा उपयोग फक्त पांघरण्या-नेसण्यासाठीच करतात असे नाही. त्यांचा उपयोग दगडावर किंवा झाडाच्या सावलीत अंथरुन त्यावर झोपण्यासाठीही करतात. धान्य, भाजीपाला इत्यादि त्यात ते बांधून ते डोक्यावर किंवा खांद्यावर वाहून नेतात. 'ही स्थितीही तशीच शंभर वर्षे चालू होती' असे माडगूळकरांनी आपले मत नोंदवले आहे.पुढे त्यांनी म्हटले, 'माणूस मेल्यानंतर, घरातील सर्वात जवळचा जो नातेवाईक असेल, त्याने पांढरी बारीक भुक्की मयताच्या घरातील जमिनीच्या कोपऱ्यात टाकून ती टोपलीने झाकून टाकणे हे अगदी ठरलेले आहे. काही वेळानंतर ती काढून त्या पांढऱ्याभागावर कोणा प्राण्याचा पाय उठला आहे किंवा नाही, हे पाहतात. तसा जर उठला असेल किंवा एखाद्या जनावराच्या पायासारखे जर काही त्या पांढऱ्या भुक्कीत दिसले, तर मेलेल्या माणसाचा आत्मा त्या योनीत जाऊन पुनर्जन्म घेणार, असे समजतात' हे कोट्सनी कलेले वर्णन तर माझ्या वृद्ध आजीच्या मरणानंतर मी आमच्या घरातच अनुभवले आहे.
कोट्स लिहितात, 'गावात प्रवेश केल्यावर एकंदरीत दृष्य पाहताक्षणी चित्त वेधण्यासाऱखे नाही. जिकडे तिकडे घाण आणि दारिद्र्य भरलेले दिसते. कुठेही नियमितपणा, नीटनेटकेपणा किंवा संपन्नता दिसत नाही. दुरून जी मातीच्या पडक्याभितीसारखी दिसतात, तीच गावकऱ्यांची घरे आहेत. ही घरे पांढऱ्या मातीची, उन्हात वाळवलेल्या विटांनी बांधलेली असतात. मातीची धाबी घरावर आहेत. काही घरे अगदी पडीक असून तेथे कोणी राहत नाही. काही घरांची छपरे गवताने शाकारलेली आहेत. ज्यांना याहून चांगली जागा मिळवण्यासाठी काही साधन नाही, असे दरिद्री लोक व त्यांची गुरे ह्यातून कशीबशी राहतात. गावातील सार्वजनिक इमारत म्हणजे महादेव, हनुमान, भैरव ह्या देवांची देवळे, एक पडझड झालेली मशीद आणि चावडी. गावातील घरे वाटेल तशी बांधलेली दिसतात. त्यात काहीही सुसूत्रता दिसत नाही.घरांच्या मधून अरुंद वाकडे तिकडे आणि गलिच्छ बोळ आहेत. कधी कधी तीन चार घरे एकमेकांना लागून असतात तर कधी दूर दूर असतात. घरे जशी संरक्षणासठी बांधलेली दिसतात. आत इतका काळोख आणि उदासीनता दिसते की त्यात राहणारी माणसे माणुसघाणी असावीत असे वाटते... '
माडगूळकर म्हणतात, ' शंभरवर्षे जाऊनही गावचे दृष्य, गावाभोवताली असलेली शेतजमीन, महारवतने, लोकांची राहणी, पोषाख, सणसमारंभ. जेवण-खाण. कर्ज- सावकार, शेतीची पद्धती, निकृष्ट गुरेढोरे, वाया जाणारा वेळ हे सर्व जसेच्या तसेच राहिले होते.'
श्री. धुर्ये यांचा अकशे पंचवीस वर्षांनी बनवलेला वृतांत सांगतो, ' गावाला आता ग्रामपंचायत झालेली होती. एकोणीसशे अकरासाली डि. लोकल बोर्डाने शाळा सुरु केली होती. त्यामुळे कोट्सच्या काळी फक्त ब्राह्मण, पाटील आणि वाणी शिक्षण घेत तेथे सन एकोणीसशे अठ्ठावन्नमधे रोटरी क्लब, मुंबईचे व्यापारी व गावकऱ्यांच्या मदतीने पाच खोल्यांच्या शाळेत नऊशे त्र्याण्णव मुले शिकत होती. ' देवळे तीन ऐवजी सहा झाली होती. बिरोबाचे महात्म्य नाहीसे झाले होते. कोट्याच्या काळात गावात प्रसिद्ध असलेले पिपरीबुवा हे भूत अजुनही जीवंत होते. दसऱ्याला रेडा बळी देण्याची पद्धत बंद झाली होती.लोकसंख्या वाढली होती. गुलाम आता नव्हते. गावात सायकली आल्या होत्या. चहाची दोन दुकाने, पिठाची गिरणी व हातभट्टीचा गुत्त्यावर दारू मिळू लागली होती. ''
- पुणे ते अहमदनगर चौपदरी महामार्गावरील या गावाजवळच मरावीज बोर्डाचे मोठे केंद्र झाले आहे. आसपास एका शिक्षण संस्थेची मोठी नावाजलेली आंतरराष्टीय दर्जाची शाळा आहे. तेथूनच आळंदीला जाणारा व संभाजीराजांच्या वधाचे स्मारक असलेल्या तुळापुर - वढूला जाणारा रस्ता फुटतो. फुलगावही अध्यात्मिक चाहत्यांना आवडीचे गाव आहे. त्यामुळे लोणीकंद गावाला जवळच्या वाघोली व कोरेगाव भीमाच्या पेक्षा जास्त प्रतिष्ठा प्राप्त आहे.
- गावाची लोकसंख्या आता सहा हजाराच्यावर आहे. उदरनिर्वाहासाठी लोकांचा शेतीवरील भार कमी झाला आहे. कारण आता लोकांना आसपासच्या कारखान्यात आणि वाघोली (सहा किमीवर) येथील पंधरा-सोळा दगडाच्या खाणीत कामे मिळतात. ज्या क्रिस्टल दगडासाठी वाघोली शैल5 जगप्रसिद्ध आहे, ती दाभाड्यांची खाण भावडी रस्त्यावर आहे. मात्र ज्यांची अजुनही शेती आहे, ते लोकवान गहू, ज्वारी, तूर, मूग, पालेभाज्या यांची शेती करतात. शेतमाल ट्रकने भरून पुणे व मुंबईच्या पेठेला पाठवला जातो.
- अजुनही गल्ल्याबोळ आहेत पण त्यांना डांबराचे कवच आहे. ड्रेनेजची व्यवस्था असल्याची खूण म्हणून सिमेंटची गोल चेंबरे रस्त्याच्यावर आलेली दिसतात.
- सायकलींचा भाव पडला होता. कमी आवाजाच्या मोटर सायकली तुरळक होत्या पण सिक्स सीटर उर्फ छकडा (वडाप) पुण्याच्या वेशीवरील येरवड्यापर्यंत जाण्यासाठी पीसीएमसी बसेसपेक्षा जास्त लोकप्रिय.
- साठीच्या वरील काही लोक आजही धोतरात दिसतात. पण पँट- शर्ट, टी शर्टात तमाम पब्लिक सर्रास होते. टीव्ही व सिनेमाच्या प्रभावाने मुलींचा पोशाख ही साडी न राहता पंजाबी ड्रेस झाल्याने त्यांच्यातील मराठी गावंढळ व लाजरेपणा कमी झाला आहे. मात्र 'बसु विद्याधाम' या मुलामुलींच्या शाळेमधील गणवेशात मुलांना गांधीटोपी सक्तीची असल्याने ती आवर्जून मुलांच्या डोक्यावर असते. प्रत्येकाच्या पायात कमीतकमी स्लीपर असते.
- हमरस्त्याजवळ जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व ग्रामनिधी अंतर्गत महिला अस्मिता भवन, पोलिस स्टेशन व ग्रामपंचायतीची6 इमारत साधारण 2000सालापासून दिमाखात उभे आहे. कॉलेजसाठी आजही वाघोलीला किंवा पुण्यास जावे लागते.
- हमरस्यावरच 1998 साली जीर्णोद्धार केलेले म्हसोबाचे बिन छपराचे देऊळ (?) आहे. तेथे पाडव्यानंतर रामनवमीच्या आधी दोन दिवसांचा उरूस भरतो. त्यात कुस्त्यांचा फड लागतो. तमाशाचे कार्यक्रम होतात. सोंगे घेणे बंद पडले आहे. बकऱ्याचा बळी देऊन सांगता होते.
- बलुतेदारांपैकी सुतार, न्हावी, बुरुड, धनगर, टिकून आहेत. सराफांच्या पेढीत सोनारांना सामावले आहे.चांभार फक्त छत्र्या व चपला दुरुस्तीसाठी उपयोगी पडतो.
- महार, मांग आदींची घरे आहेत पण नवसमाजरचनेमुळे बलुतेदारांच्या जातींचा उल्लेख टाळला जातो. त्यांचे राहणीमान बदलल्याचे जाणवते. पण काही झोपड्या व पत्र्याच्या चाळ वजा घरात डोकावले तर दारिद्र्याचे दर्शन होते.
- भैरव, महादेव मंदिरे अजून आपले अस्तित्व टिकवून आहेत. हनुमानाचे मंगलोरी कौलांचे छप्पर असलेले मंदीर चावडीजवळ आहे. तेथेच गाववेशीचा "गडधू" होता. 2003-4 मधे चावडीच्या नव्या इमारतीच्या बांधकामाच्या धामधुमीत गडधूला तेथून परागंदा व्हावे लागले असावे. तो आता एकाच्या परसदारी पडलेला आहे. तीच वेळ या खालील दगडी डमरु सदृ्ष्य एका पत्थरावर आहे.
- गावात नजर टाकता आता काळी मातीची कौले जाऊन मंगलोरी कौलांनी आपले बस्तान बसवले आहे. तर अनेक चुन्या-विटांच्या घरांना बाहेरून सिमेंटचा गिलावा करून रंग लावलेला दिसतो. काही ठिकाणी टीव्हीच्या डिशछत्र्या वाकडी मानकरुन लोणीचे शहरीपण दर्शवतात.
- पिंपरीबुवा भूत स्थान आता "वेताळबुवा "नावाने बस्तान ठोकून आहे. पण ते आता कोणाला पछाडताना दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले.
- विठोबाचे मंदिर अत्यंत क्षीण झाले तरीही तग धरून आहे. वारीच्या वेळी काही पांथस्थ त्याचा आश्रय घेतात असे आसपासच्या रहिवाश्यांनी सांगितले.
- एक गोष्ट आणखी कळली की लोणी गावी गोराजीच्या काळात टपाल व्यवस्थेचा भाग म्हणून आठ घोड्यांची पागा व तबेला हमरस्त्यावर म्हसोबाच्या देवळाच्या विरुद्ध दिशेला होता. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. मशीदही आहे.
- कोट्स यांच्या उताऱ्यात सन 1820च्या वेळच्या काही वस्तूंच्या किंमती सांगितल्या आहेत. 2009 च्या सांप्रतकाळी, वस्तुंच्या किंमती आजच्या वाचकांना माहित असतील पण हा लेख नंतरच्या काळात कोणास निदर्शनाला आल्यास त्यांच्या सोईसाठी पुण्याच्या मार्केटयार्डातील काही बाजारसमितीचे (भावांबद्दल घोळ होऊ नये म्हणून सकाळ मधे छापुन आलेले) घाऊक भाव नोंद करीत आहे. थोड्याफार फरकाने त्याच किंमती आजच्या लोणीसारख्या शहराला लागून असलेल्या खेड्यांत आहेत असे ग्रामस्थांशी चर्चेत कळले.
- धान्ये प्रती रु, किलो/ लिटर- तांदूळ साधा 17ते 36, अंबेमोहोर 40, बासमती 18ते 90, साखर - 28 ते 32, गहू - 13 ते 18, ज्वारी -10 ते 15, गूळ - 26 ते 30, डाळी- तूर 72 ते 85, मूग - 58 ते 62, मटकी- 52 ते54, हरभरा - 31 ते 34. पोहे -17 ते 22, मुरमुरे -भडंग 36, नारळ 8 ते 12. तेल (प्रती लिटर) - शेंगदाणा - 70, सोयाबीन -52 ते 56. वनस्पती - 43 ते48, खोबरेल -55 ते 60. दूध -24 गाय म्हैस - 30.
- भाजीपाला - कांदा14, - , बटाटा -15, टॉमॅटो -20, मटार - 60, मिरची - 20, कोबी - 30, फ्लॉवर - 50 , मेथी - जुडी - 6-8 , पालक - 6, आळू - 2, शेपू - 2, कढीपत्ता - 1, कोथिंबिर - 8, लिंबू - नग - 2.
- फळे - सफरचंद किलो- 100, संत्रा - 60-70 , पपई -10, चिकू -40, कलिंगड - 40-50, सिताफळ - 4 , पेरू नग - 5, शहाळे -3-8 ,
- दूध लिटरला - गाय 24 , म्हैस - 28. चहा कप - 4-6, कॉफी - 6- 8 व उपहाराचे पदार्थ - उपमा - 8 -12, इडलीवडा प्लेट -15 ते 25, डोसा - 25 -35, टोस्ट आमलेट - 18 - 25,
- अंडी प्रती नग -2.20, चिकन - जिवंत 56, ड्रेस्ड् -73,.मटन - 220.
- केबल टीव्ही विभागाप्रमाणे 150 ते 340 दरमहा, न्यूजपेपर - 2-3, मासिके - 25 ते 40,
- पेट्रोल- 51, डीझेल 47, चलन रुपयात - डॉलर - 47.81, पौंड - 79.51, युरो - 67.83.
- सोने-प्रती - दहाग्रॅम रु.14940. चांदी - रु. 2345.
यामधे इतरांनी भर घालून या सांप्रत वृतांताला वेऴोवेऴी ताजा ठेवावा अशी विनंती.
नोंदकर्ता - विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. ए-4/ 404 गंगा हॅमलेट हौ. सो. विमाननगर. 411014.
मो -9881901049. Email: shashioak@gmail.com
notes
1 व्यंकटेश दिगंबर माडगुळकर, जन्म - 6 जुलै 1927, मृत्यु - 28 ऑगस्ट 2001.
2 सर्जन कोट्स जन्म ??- मृत्यु??
3 श्री. धुर्ये जन्म ??- मृत्यु ??
4 विंग कमांडर शशिकांत जनार्दन ओक, जन्म -31 जुलै 1949 मृत्यु - ?? .
5 सिन्नर जवळील गारगोटी नावाच्या शैल संग्राहालयाला भेट दिली की वाघोलीचे महात्म्य कळते.
6 सध्याचे सरपंच - श्रीकांत कंद, आमदार - विलासराव लांडे. खासदार- शिवाजीराव अढळराव पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा