संपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार
प्रेषक शशिओक (सोम, 03/29/2010 - 14:13)
* भाषा
* अनुभव
प्रा. अद्वयानंद गळतगे
- ग्रंथ परिचय –
विज्ञान अणि चमत्कार
बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान?
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय?
अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तावनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.
ग्रंथाची शुद्ध विज्ञानवादी भूमिका -
शुद्ध विज्ञानात 'दैवी शक्तीला' किंवा 'परमेश्वर' या व्यक्तीरुपी संकल्पनेला अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्याची नैसर्गिक उपपत्ती शोधते. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जड़वादी तत्वज्ञानावरही प्रहार करते. असे ते दुधारी शस्त्र आहे. अतिंद्रिय घटनांनी भौत विज्ञानाचे नियम पाळलेच पाहिजेत असा दुराग्रह का धरावा? विश्वातली सर्व रहस्ये माहित नसताना जडवादी विचारवंतांनी आपली दुराग्रही मते पुन्हा तपासावीत, असा लेखकाचा उद्देश ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले की लक्षात येतो.
भानामतीच्या विविध केसेसची प्रत्यक्ष भेट देऊन केलेली छाननी, घटनांची अर्थपू्र्ण फोड, आक्षेप व प्रतिआक्षेप - त्यांची तर्कपुर्ण तपासणी, विरोधी विचारांच्या व्यक्तींचे तोकडेपण आदि गोष्टी ग्रंथ वाचनाच्या वेळी प्रकर्षाने जाणवातत.
अभ्यासपुर्ण ओघवती भाषा व विज्ञाननिष्ठ विवेचन त्यामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येतो. ३५० पेक्षा जास्त संदर्भ व टिपणे यातून प्राचार्य गळतगे यांनी पाश्चात्य संशोधकांपासून ते भारतीय ऋषिमुनी, संत-महंतांचे दाखले ग्रंथाच्या पानोपानी दिले आहेत. इंग्रजी उताऱ्यांचे त्यांनी केलेले सोपे व अचुक भाषांतर वाचून थक्क व्हायला होते.
या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचा बुरखा घेऊन श्रद्धास्थानांना थोतांड म्हणवणाऱ्या स्वयंनिर्मित समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे. खोटे लिहायचे व बोलायचे, सरळ सरळ फसवणे शक्य नसेल तर खोटे सुचवायचे हे तंत्र या विचारकांचे महत्वाचे शस्त्र आहे. हे तंत्र फक्त मराठी भाषिकातील संस्था व व्यक्ती वापरत नाहीत तर जगभरातील सर्वच रॅशनॅलिस्ट संस्था व व्यक्ती कशा व किती टोकाच्या थराला जाऊन वापरतात याची उदाहरणे या ग्रंथात अनेकवेळा वाचायला मिळतात.
वैचारिक वाद घालताना प्रा. अद्वयानंदांचे नाव विकृतकरून लिहिणे, संतांचे चमत्कार खरे की खोटे यावर लिहिताना, रामऋष्ण परमहंसांची 'मिरगी झालेली व्यक्ती' अशी संभावना करणे, गळतग्यांची पुस्तके विकत घेणार नाही, वाचणार नाही पण त्यांनी आमची (प्रतिपक्षाची) पुस्तके विकत घेऊन वाचावीत आदि हुकूमशाही मनोवृत्तीची लक्षणे त्यांनी दाखवून दिलेली आहेत. अशा 'विवेकवादा'विरुद्ध गळतग्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्याचे नाकारणारे नागपूरच्या डॉ.नी.र. वऱ्हाडपांड्यांना विवेकवादी समजायचे कि हटवादी?
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ग्रंथात 'नाडी ग्रंथ भविष्य' यास 'आकाश लखनाचा नुर्णायक पुरावा' असे म्हटले गेले आहे. त्यांनी स्वतः दक्षिण भारतात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन नाडी ग्रंथ अदभूत चमत्कार ठरतात यात संशय नाही असे म्हटले आहे. आपल्या अपत्यांची नावे ठेवण्यास आपण स्वतंत्र आहेत असे आपण समजतो. परंतु ती नेमकी नावे नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यात तंतोतंत येतात याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे काय नाव असेल हे अगोदरच ठरून गेलेले आहे.असे लक्षात येते. अगस्त्य आणि अन्य नाडी ग्रंथकर्त्यां महर्षींनी ती नावे व व्यक्तीचे भविष्य 'आकाशरुपी कॅनव्हास' वर अगोदरच ठरवून लिहिलेले जीवननाट्यपट वाचून ती सांगितली. म्हणजेच अगोदर ठरवून लिहिलेल्या नाटकाच्या कथानकाचा तो एक भाग आहे असे म्हणावे लागते.
'नाडी ग्रंथ' - 'विश्व एक नाटक' असल्याचा तो सार्वजनिक पुरावा आहेत. त्यामुळे आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा आहे, असे गळतगे यांचे प्रतिपादन आहे.
विश्व हे एक नाटक वा चित्रपट असेल तर मानवाच्या इच्छा स्वात्रंत्र्याचा अर्थ कसा लावायचा? आकाश लेखन हे निर्णायक सत्य असेल तर 'मानवाला इच्छा स्वातंत्र्य नाही' हे खरे नसून मानवाचे इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उलगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.
म्हणजेच ज्याला सामान्य लोक 'स्वातंत्र्य' समजतात त्या ईश्वरी मायेच्या 'बंधनात' पडतात म्हणजेच आपले ईश्वरीय स्वातंत्र्य गमाऊन बसतात. अशा रीतीने पुण्य करण्याचे तथाकथित बंधन हे खरे अध्यात्मक 'स्वातंत्र्य' आहे. पाप करण्याचे तथाकथित सैतानाचे 'स्वातंत्र्य' हे खरे मायेचे 'बंधन' आहे.
संत रामदास स्वामींचे प्रयत्नवादाचे वचन -
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे।।
आणि संत तुकारामांचे नियतीवादाचे वचन
जे जे संचिती। ते न चुके कल्पांती।
होणार ते ते होऊन जाय । व्यर्थ बोलोनिया काय ।।
लाभ अथवा हानी । घरा येता चासोनी।
तुका म्हणे स्वस्थ मन । करा विठ्ठल चिंतन।।
येथे दोन्ही सत दोन परस्पर विरोध दृष्टीकोनाचे आहेत असे वरवर दिसत असले तरी दोघांनीही त्यासाठी ईश्वराची साक्ष काढली असल्याने तो विरोध वरवरता आहे हे स्पष्ट होते. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्व विरोध मावळतो.
मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.
संत ज्ञानेश्वरांच्या १२ व्या अध्यायातील ओवीचा दाखला देताना प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.
विश्व हे गारुडाचा खेळ नसून ते खरे आहे हे समजले की 'चमत्कार' हे खरे आहेत हे कळते. (चमत्कार हे एकाच वेळी खरे व खोटे कसे? पोट मथळा पृष्ठ- ३९९) विश्व हे नाटक आहे हे कळले की मानवाला ईश्वराहून वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खोटे हे कळते. विश्व हे नाट्य आहे हे ज्याला माहित नाही किंवा मान्य नाही अशा बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीला स्वतःला वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खरे वाटते. मग त्यांना चमत्काराच्या नियमभंगाच्या उपपत्तीची समस्या सोडवता येत नाही व त्यामुळे चमत्कार नाकारायचा म्हणजेच ते खोटे म्हणण्याचा अर्थहीन आडमुठेपणा करावा लागतो.
टोलनाक्यावर कर चुकवण्यासाठी रात्रभर अन्य मार्ग हुडकून फिरत पहाटे परत टोलनाक्यावरच येणाऱ्या गाडीवानासारखी अवस्था ब्रह्म विज्ञानाच्या कर्मर्सिद्धांतांची ओळख नसल्याने पाश्चात्य शास्त्रज्ञांची झाली आहे. अशा आडरानातील अंधाऱ्या रस्त्याने फिरणाऱ्या शास्त्रज्ञांचा प्रतिनिधी म्हणून लेडरमन यांचा उल्लेख करता येईल असे गळतगे प्रतिपादन करून पुढे म्हणतात, त्याच्या God Particle(1993) ग्रंथात त्यांनी अंतिम भौतिक कण हाच ईश्वर मानला जावा अशी त्यांची धारणा होते! या शिवाय जॉन पोकलिंग हॉर्न यांचे Beyond Science(1996), आर पन रोज यांचे Emperor's New Mind(1987) ब्रायन एपलयार्ड यांचे Understanding the Present (1992) असे अनेक दाखले प्रा. गळतगे यांनी वानगी दाखल दिले आहेत.
क्वांटम सिद्धांत पाश्चात्य विज्ञानाचा रुढ दृष्टीकोन मुळातच अपुरा असल्याचे दाखवून देतो. रूढ विज्ञानातून कार्यकारण भावाची कायमची हकालपट्टी करण्याची गरज सिद्ध करतो. डेव्हीड बोहम म्हणतात, अणुचे जेंव्हा कोणीही निरीक्षण करत नाही तेंव्हा त्याला कोणतेही गुणधर्म नसतात. म्हणजेच कोणाचेतरी पहाणे, पाहणारा किंवा त्याचे मन (Consciousness) प्रत्यक्षात अणू भौतिक रुपाने अस्तित्वात आणते. तात्पर्य अणुला 'वस्तुनिष्ठ' अस्तित्व नसून 'व्यक्तीनिष्ठ' अस्त्वित्व असते.
अणु जड भौतिक नाही किंवा खरा नाही असा याचा अर्थ नसून अणूचा जडपणा (गुणधर्म )किंवा खरेपणा (अस्तित्व) हे मानवाच्या त्याला पहाण्याच्या मनामुळे प्राप्त होते असे क्वांटम सिद्धांता वरून सिद्ध होते. त्यामुळए भानामती, UFO, आदींना मानवी मनामुळे खरेपणा, अस्तित्व प्राप्त होते. ही उपपत्ती क्वांटम सिद्धांत ही उचलून धरतो.
समारोप -
जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा अंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.
पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.
ग्रंथपरिचय – विंग कमांडर शशिकांत ओक
लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३९९. मो - ०९९०२००२५८६ .वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.
»
* 343 वाचने
ह्म्म्म्
प्रेषक ऋषिकेश (सोम, 03/29/2010 - 17:39)
ग्रंथ मोठा दिसतो. सहज ग्रंथालयात मिळाला तर नक्की वाचेन.
बाकी नाडीसारख्या करमणूक-व्यवसायापेक्षा, "देव" व "कर्मकांडा"सारख्या मोठ्या संकल्पनांवर / प्रश्नांवर हे पुस्तक काय भुमिका घेते व कसा उहापोह करते हे वाचण्यास उत्सुक आहे.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
»
* प्रतिसाद
* ऋषिकेश यांना व्यनि पाठवा
ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान
प्रेषक वसंत सुधाकर लिमये (मंगळ, 03/30/2010 - 16:20)
संपूर्ण लेख वाचलेला नाही , वर वर चाळला.
पुस्तकाचे स्कॅन केलेले पान वाचले.
प्रा. गळतगेंनी सादर केलेले पुरावे कुठल्या जर्नलमधे वाचायला मिळतील ते कळावे.
विज्ञानाला सगळ्या गोष्टी माहित आहेत असा दावा विज्ञानाचाही नाही.
तसे असते तर विज्ञान हा प्रकार कायमचा थांबला नसता का?
पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे.
काय प्रकार आहे ते लक्षात आले.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
»
* प्रतिसाद
* वसंत सुधाकर लिमये यांना व्यनि पाठवा
माफक अपेक्षा
प्रेषक शशिओक (मंगळ, 03/30/2010 - 18:17)
संपूर्ण लेख वाचलेला नाही, वर वर चाळला.
काय प्रकार आहे ते लक्षात आले.
निदान ग्रंथपरिचय पुर्ण वाचावा. ही माफक अपेक्षा आहे. नंतर आपली उत्सुकता वाढली तर संपुर्ण ग्रंथ वाचावा.
ही नम्र विनंती
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»
* संपादन
* प्रतिसाद
निव्वळ भामटेपणा
प्रेषक बाबासाहेब जगताप (बुध, 03/31/2010 - 07:08)
*या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे.
अंधश्रद्धेचे उच्चाटन ही गेल्या शंभर ते दिडशे वर्षापूर्वीपासून जोर धरत असलेली संकल्पना आहे. त्या आगोदरच्या शेकडो वर्षात सामान्यजनांना वैचारिक पंगू बनवण्याचे काम या असल्या चमत्काराच्या शिलेदारांनीच केले आहे. यांचे पितळ उघडे पाडून वैचारिकदृष्ट्या सामर्थ्य देण्याचेच काम सुधारकांनी केले आहे.
*समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे.
आजपर्यंत कुणाचा खोटारडेपणा पुढे आला हे सर्वांना माहित आहे. विकृती ही उपचाराच्या नावाखाली (भानामती काढणे वगैरे ) स्रियांवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये आहे. की अध्यात्मानुभव देण्याच्या नावाखाली स्वतःच्या शारिरीक लालसांची पूर्ती करणाऱ्यांमध्ये आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी.
(असल्या काही कृत्यांची उदाहरणे दिली की आम्ही त्या गावचे नाहीच हे ही चमत्कारांचे समर्थक बिनधोकपणे ठोकून देण्यास कमी करत नाहीत.)
*इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उ लगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.
इच्छा स्वातंत्र्य हे विश्व नाटककाराचे आहे पण चांगल्या इच्छा (म्हणजे चमत्कारसमर्थकांना अनुकुल असलेल्याच) ह्याच इश्वराच्या कारणाने आहेत असे असेल तर जगातल्या वाईट इच्छांचे काय. की इश्वर यांच्यापूढे हतबल झाला आहे.
*प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.
जे करतो आहे ते इश्वरच करवून घेतो आहे. असे म्हणून काही बाबाबूवा भक्तांना मारझोड करतात. एक इच्छाधारी बाबा तर कड़कडून चावा घेतो आणि म्हणतो ये तो सब शंकरजी करवाते है. उद्या हे भामटे स्रियांचे विनयभंग आणि बलात्कारही इश्वराच्या नावावर खपवतील. कारण यांना पक्के माहीत आहे की इश्वर नावाची शक्ती नाहीच मग ती आपले काय बिघडवणार.
*जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे.
हे विधान म्हणजे उघडउघड थापेबाजी झाली. हे जर खरे असते तर विद्युतप्रवाह, प्रकाशाचा वेग, वेगवेगळ्या वायूंचे अस्तित्व त्यांचे गुणधर्म, रासायनिक, भौतिक व जैविक क्रियाप्रतिक्रियांचा उलगडा यांचे शोध शास्राला लागलेच नसते.
जे डोळ्यांना दिसते तेच सत्य असे जर भौतिक शास्राने मानले असते तर त्यानेही या भामट्यांच्या पूर्वजांप्रमाणे पृथ्वीला केंद्रस्थानी सुर्यताऱ्यांना तिच्याभोवती फिरणारे असे मानले असते.
एकूणच असली साहित्यसंपदा म्हणजे मरणप्रायअवस्थेतली भूते पून्हा जागीकरण्याचा व त्यातून स्वतःच्या मनोउड्डाणांना जगावर लादण्याचा प्रयत्न आहे.
एका शब्दात निव्वळ भामटेपणा.
»
* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा
बाबासाहेब
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 08:39)
बाबासाहेब भ्रमसेन व ठकसेन वाचताय ना?
प्रकाश घाटपांडे
»
* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा
व्हॅटीकन
प्रेषक गुंडोपंत (गुरू, 04/01/2010 - 12:47)
बाबासाहेब यांचे बरेचसे विवेचन चर्चच्या लोकांनाही लागू होते असे दिसते. सध्या तरी चर्च म्हंटले की लोक आपापली मुलेबाळे सांभाळायला लागले आहेत असे दिसते.
आपला
गुंडोपंत
»
* प्रतिसाद
* गुंडोपंत यांना व्यनि पाठवा
चर्च असो की आश्रम
प्रेषक बाबासाहेब जगताप (शुक्र, 04/02/2010 - 07:54)
गुंडोपंतांनी दिलेल्या दूव्यांवर चर्च मध्ये बोकाळलेल्या श्रध्दां(!)चा गैरफायदा घेणाऱ्या वर स्वतःला अलौकीक समजणाऱ्यां धर्मशासकांच्या कृत्यांचा पाढा वाचला. चर्च असो की आश्रम मुलाबाळांना संभाळायला हवेच. त्या आधी स्वतःच्या अविवेकी श्रध्दांनाही मुरड घालायला हवी. अशी मुरड घालून पून्हा पातकाच्या दहशती खाली वावरणे हे ही परवडणारे नाही. त्यासाठी अंतरंगात भिनलेल्या काही समजांना मूळापासून उखडून निर्भीड आयुष्य जगायला हवे.
»
* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा
हे भ्रमसेनच
प्रेषक बाबासाहेब जगताप (बुध, 03/31/2010 - 09:53)
धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे. कारण या विषयांत मोक्ष,स्वर्ग, नरक,परलोक, परब्रह्म, परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, तसेच अतीन्द्रिय अनुभव,भावातीत ध्यान, समाधी,साक्षात्कार,दृष्टान्त, अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत.त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे. पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे.बाबा,बुवा, बापू, महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत.त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो.ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो
भ्रमसेन व ठकसेन वाचतांना वरील लेख न आठवलेला (वाचला असल्यास) उपक्रमी सापडणे कठीणच.
एकूण हा भ्रमसेनाचाच अवतार दिसतो. कदाचित विश्वनाटककाराच्या पूढे काही एक न चालल्याने सुदैवाने त्यांचा ठकसेन झाला नाही. आजच्या अध्यात्म (!) युगात घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की आजचा भ्रमसेन उद्याचा यशस्वी ठकसेन कधी होईल याचा नेम नसतो. आणि या बाबांच्या भक्तमंडळीत आपले बाबा आणि दूसरे बूवा यांच्यात भेद करण्याचीही विलक्षण हातोटी असते. जोपर्यंत कारनामे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळे अध्यात्मगुरुच असतात. आणि या ठकसेनांच्या भक्ताच्या गर्दीत अनेक भ्रमसेन असतात ज्यांना की बाबांनी घातलेली लाथही कृपाप्रसादाप्रमाणे वाटते.
»
* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
प्रेषक शशिओक (बुध, 03/31/2010 - 16:55)
प्रा. गळतगे यांच्या ग्रंथपरीक्षणाच्या धाग्यात खालील प्रतिसाद थोडा अप्रस्तूत वाटेल पण वरील विचारांत त्याचा भाग आल्याने येथे डकवत आहे.
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील?
स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व.
या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो :
...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.....
ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे..
..
{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.
नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.
आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.
नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.
भागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»
* प्रतिसाद
खुलासा: नव खोडायचे होते
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 17:23)
स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
मला माझ्या प्रश्नात नव खोडायचे होते. विचारण्याचा उद्देश असा होता की जर कल्पना नवी नसेल पण कर्ता तिच्याशी प्रामाणिक असेल तर तो भ्रमसेन ठरेल का? ते तसे न दिसून आल्याने कोणाचे गैरसमज झाले असतील तर क्षमस्व!
नव खोडण्यामुळे वरील प्रश्न असा दिसला असता -
स्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
असो.
हा खुलासावजा उपप्रतिसाद केवळ वरील प्रतिसादासाठी दिलेला आहे. वरील प्रतिसाद इतरत्र दिसल्यास प्रत्येक ठिकाणी खुलासा देत जाणार नाही.
»
नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे?, ते खरेच असते का?, मला पहायला मिळेल का?, कुठे?, फी किती?, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे?, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का?, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता? सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे?, त्यात मला सहभागी होता येईल का? For more, please visit http://www.naadiguruonweb.org/
Welcome to New APPS and Websites
Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.
For more, please visit
For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा