Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास

वाचकमित्रहो, प्रथमत: आपणा सा-यांना दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांस सुखसमृद्धीची, आनंदाची आणि ज्ञानजिज्ञासेची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. विविध विषयांच्या अभ्यासकांसाठी नाडिग्रंथांमधील रोचकता ही केवळ भविष्यकथनापुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्याही पलिकडील अनेक विषयांच्यावर आज चर्चा होतांना दिसते. ह्यात मुख्यत: नाडिग्रंथांतील लिपी, भाषा, उपयोजिलेले काव्यप्रकार अशा; थोडक्यात, ज्योतिषशास्त्राहून भिन्न अशा विषयांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास होतांना दिसून येतो.

ह्याच अनुषंगाने जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे झालेल्या नाडिग्रंथ अधिवेशनामध्ये मी "कूटलिपी - एक विचार" हा नाडिग्रंथांत आढळणा-या लिपीबाबतचा विश्लेषणात्मक शोधनिबंध चर्चेसाठी पाठवून दिला होता. (पूर्वप्रसिद्धी: उपक्रम दिवाळी अंक २००९). ह्या शोधनिबंधावर चर्चा घडल्या, त्याहीनंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून वैयक्तिकरीत्या तसेच जाहिररीत्या प्रश्न केले, ते सारांशात असे: "हैयो, आपण ग्रंथलिपी आणि नाडिग्रंथांतील कूट्टेळुत्तु लिपी ह्यांचा संबंध दाखविणारी शोधनिबंधामध्ये प्रस्तुत केलेली माहिती मोठी रोचक आहे. लिपीशास्त्राभ्यासाच्या निमित्ताने आपण नाडिग्रंथांतील विविध हस्तलिखिते हाताळल्याचे आपल्या विश्लेषणातून कळते. ह्या विषयाबाबतचा आपला दृष्टीकोन हा तटस्थ आहे, प्रामाणिकही वाटतो. तेंव्हा त्या हस्तलिखितांतील मजकूर काही कां असेना, आपण आतांपर्यंत अभ्यास केला त्यात आपणांस काय दृष्टीपथास पडतें, त्याबद्दल सांगा बरें! विंग कमांडर (श्री. शशिकांत ओक) साहेब पट्ट्यांतून जातकाची नांवे, कुंडलीचे वर्णन इत्यादि येते असे ठासून सांगतांत, त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?"

अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते.
नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. आपल्या विचारप्रक्रीयेस असा दावा निश्चितच चमत्कारिक वाटतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात, तर इतर काहीजण "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथचिकित्सा करावयास जातात.

नाडिकेंद्रात प्रवेश केल्या केल्या जाम गोंधळलेली - बौचळलेली दिसणारी अशी काही चिकित्सक मंडळी मी स्वत: पाहिली आहेत. तसेही, अ-तमिळ भाषकांस नाडिग्रंथकेंद्रातील वातावरण हे एकुणातच जरासे गूढ वाटणे सहज शक्य आहे. भिंतीएवढ्या आकाराची तमिळ देवदेवतांची आणि ऋषीमहर्षींची प्रकाशचित्रे, नाडिग्रंथ साठवून ठेवण्यासाठीची ती जुनाट लाकडाची कपाटे, त्यातल्या फूटपट्टीच्या आकाराच्या, वर्षानुवर्षे हातही न लागलेल्या वाटणा-या, अत्यंत नाजुक अशा ताडपत्र्या, कायम ’असहकार चळवळ’ पुकारल्याप्रमाणे वागणूक वाटणारे ते नाडिवाचक, त्यांचे तमिळ उच्चाराचा प्रभाव असलेले संभाषण, मुंगळ्यांची रांग चालेलशी दिसणारी त्यातील ती ठसठशीत उठावदार ग्रंथ-वट्टेळुत्तु लिपी, वाचकांचे ते अगम्यसे वाटणारे ग्रंथवाचन, आणि ह्या सा-याच्या उपर आपल्या अनुभवांविषयी विविध दावे करणारे नाडिग्रंथप्रेमी हे सारे एकत्रितरीत्या विचार करता अत्यंत गूढ आणि रहस्यमय वाटत जाते. अर्थात, आपणास ह्या सा-यामागील मुख्य तत्त्वें, त्यातील कारणभाव उमगेल, तर त्यात गूढ असे काहीही नाही हेही लक्षात येईल. तरीही चिकित्सकमंडळी मुख्य तत्त्वें सोडून इतरत्र भरकटत असतात असे मला नेहमी वाटत आलेले आहे. एका नाडिकेंद्रामध्ये वानराच्या अंगठ्याचा ठसा घेवून आलेला एक मनुष्य, त्याची गोष्ट नंतर कधीतरी सांगेन. असो. 

काही चिकित्सकांच्या अशा अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते. ह्या ग्रंथांतील तमिळभाषा ही संगकाळात वापरली जाणा-या पुरातन भाषेशी जवळीक साधणारी असून, नाडिवाचकांव्यतिरिक्त तिची माहिती असणारे लोक (फार थोडे असले तरीही) अजून आहेत. एक भाषाभ्यासक म्हणून विचार करता, स्वत:लादेखील ह्या भाषेची फोड करणे कठिण नाही असे मला लक्षात येतें आणि त्याप्रमाणे एका स्वतंत्र दृष्टीकोनातून नाडिग्रंथांबद्दल स्वत:स जे काही दृष्टोत्पत्तीस येते, ते प्रामाणिकपणे इतरांसमोर प्रस्तुत करावयाचा हा एक प्रयत्न होय.

नाडिग्रंथांमध्ये लेखन केलेले असते काय, असल्यास ते कोण्या लिपीमध्ये ह्या स्वत:स पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी केलेल्या संशोधनामध्ये मला जे काही आढळले ते मी "कूटलिपी - एक विचार" ह्या शोधनिबंधात स्पष्ट केलेलेच आहे. ह्या शोधनिबंधानंतर आंतरजालावरील उपक्रम, विशेषत: मिसळपावावरील तसेच माहितीतील अनेकांनी स्वत: होवून आपणा स्वत:च्या तसेच आप्तस्वकीयांच्या नाडिग्रंथांवरून लिहून काढलेल्या वह्या मजजवळ (नांवे उघड न करण्याच्या अटींवर) अभ्यासासाठी पाठवून दिल्या. आंतरजालावरील सदस्यांच्या वह्यांची पडताळणी केल्या जावू शकली नाही, परंतु माहितीतील लोकांच्या वह्या ह्या पट्टींतील लेखनावरूनच केलेले आहे, ह्याची पडताळणी केलेली आहे. एकत्रितरीत्या ह्या सा-या व्यक्तींचे नाडिग्रंथावलोकन हे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरु, चेन्नै, वैत्तिश्वरन् कोयिल् आणि दक्षिणभारतांतील इतर काही ठिकाणचे, थोडक्यात विविध ठिकाणचे आहे. व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद कोरून येते हे म्हणणे बरोबर आहे काय ह्या प्रश्नाचे सिद्ध उत्तर देण्यासाठी ह्या वह्यांतून मला ह्याबाबतीत काय दिसते ते मी आपणासमोर ठेवू इच्छितो. खरे पाहता तूर्तास नाडिग्रंथलेखनामध्ये आढळणा-या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमानांच्याबद्दलच बोलावें, परंतु प्रश्नाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या वह्यांमध्ये जन्मविषयक नोंद श्लोकाच्या रूपाने कशी मिळते, त्यांत काय सांगून येते, त्यांतून नाडिवाचक आपणांस आपला जन्मदिनांक कसा सांगतो, त्याबद्दल पाहूया:
पहिली वही सध्या वयाने साधारणत: तिशीमध्ये असणा-या व्यक्तीची आहे. त्यांत जन्मविषयक नोंद खालील श्लोकाच्या रूपाने येते:


तमिळ लिपीमध्येदेवनागरीमध्ये लिप्यंतरीत
மேலான சித்தார்த்தி ஆண்டுத்தோற்றம்
மாடதுவின் திங்களதில் இருபானீர்தெய்தி
சாலசெய் வாரமதில் சித்திரைவின்மீன்
சாற்றரவி மையின்மேல் கவிசேயுள்ளே
உள்ளதன்பின் ரவியேர் மாலும்யாழில்
உயர்மன்னன் வயலதுவில் கரிராவேங்கை
கள்ளமிலா மதிமங்கை சிகிகலசம்   
मेलाऩ सित्तार्त्ति आण्डुत्तोट्रम्
माडदुविऩ् तिङ्गळदिल् इरुबाऩीर्तॆय्ति
सालसॆय् वारमदिल् सित्तिरैविऩ्मीऩ्
साट्ररवि मैयिऩ्मेल् कविसेयुळ्ळे
उळ्ळदऩ्पिऩ् रवियेर् मालुम्याऴिल्
उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल् करिरावेङ्गै
कळ्ळमिला मदिमङ्गै सिगिहलसम्

ह्या श्लोकातील पहिल्या दोन ओळींचा अर्थ: ह्या व्यक्तीचा जन्म सिद्धार्थी (तमिळ उचार ’सित्तार्त्ति’) संवत्सरात रवी वृषभाच्या (माडदुविल्) महिन्यात असतांना तमिळ पंचांगाप्रमाणे २२ व्या तिथीवर मंगळवारी झाला. एवढ्याश्या माहितीवरून नाडिवाचकास आपला जन्मदिनांक प्रचलित पद्धतीप्रमाणे आंग्लभाषेमध्ये सांगण्यासाठी गणित घालणे आवश्यक असते. ह्यासाठी भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक होय. नाडिग्रंथांतील श्लोकांमधून व्यक्तीच्या जन्माशी निगडीत दिनांकाची मांडणी ही नेहमी संवत्सर / मास / दिन अशा क्रमपद्धतीने समोर येते. ग्रंथांतील संवत्सराचे नांव हे तमिळभाषक लोकांच्या ६० वर्षांच्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे नोंदविलेले आढळते. अभ्यासकांच्या मते अत्यंत अचूक अशी ही दिनदर्शिका असून तीत संवत्सरांची नांवे आणि त्यांचा क्रम हा ठरलेला असतो. अशा ह्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे सित्तार्त्ति म्हणजे एप्रिल १९७९ ते मार्च १९८० होय. एवढ्या ह्या माहितीवरून व्यक्तीच्या जन्मवर्षाची साधारण कल्पना आपणास येते. येथून पुढे सूर्य कोण्या महिन्यात कोण्या राशीत प्रवेश करतो हीही माहिती ठेवणे आपणास आवश्यक ठरेल. साधारणत: १५ मे च्या सुमरास सूर्य वृषभराशीमध्ये प्रवेश करतो असे धरून, १५ मे पासून पुढे २२ दिवस मोजणे आतां आपणास आवश्यक आहे. हे मोजून येतो तो दिनांक म्हणजे ६ जून होय. थोडक्यात, ६ जून १९७९ हा दिनांक आपणास मिळाला.
खरेतर, तमिळ दिनदर्शिकेनुसार वरील श्लोकांत उल्लेखलेले सिद्धार्थी वर्ष हे १९७९-१९८० पूर्वी १९१९-१९२० मध्येही येवून गेलेले आहे, आणि ह्यानंतरही ते २०३९-२०४० मध्ये येणार आहे. अशावेळी, जातकाचा जन्म १९७९-१९८० मध्येच झाला हे नाडिवाचक कसेकाय सांगेल? अर्थात, समोर बसलेल्या जातकाकडे बघून तो वयाने तिशीतील आहे हे नाडिवाचकास नक्कीच कळू शकेल; तरीही, नाडिग्रंथांतून वाचून नाडिवाचक जे काही सांगतो आहे, त्याची खात्री जातकाने कशी पटवून घ्यावी? ही खात्री पटण्यासाठी नाडिग्रंथलेखकाने पडताळणीची सोय करून ठेवलेली असल्याचे आपणास क्रमश: येणा-या श्लोकांमधून कळते. पुढील श्लोकांमध्ये सिद्धार्थी नामक त्या विवक्षित संवत्सरामध्ये सूर्य वैशाख महिन्यात प्रवेशून २२ वी तिथी असतांना मंगळवारी अवकाशामध्ये जी काही ग्रहस्थिती होणार असेल, तिची नोंद नाडिग्रंथलेखकाने आपणासाठी आगावूमध्येच करून ठेवल्याचे सांगितले जाते. वरील श्लोकांत ही नोंद पुढीलप्रमाणे आलेली आहे: नक्षत्र चित्रेत, मेष लग्नामध्ये शुक्र आणि मंगळ (मैयिन्मेल् कवि सॆय्); त्याच्यापुढे रवि (अदऩ्पिऩ् रवि); मिथुनेत बुध (मालुम्याऴिल्); कर्केत गुरु (उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल्); सिंहेत राहू आणि शनि (करिरावेङ्गै) कन्येत चंद्र (मदिमङ्गै); कुंभेत केतु (सिगिहलसम्). ही ग्रहस्थिती ६ जून १९१९ मध्येही येणार नाही, अन् ६ जून २०३९ मध्येही येणार नाही. १९७९ मध्ये जून महिन्यातील ६ व्या दिवशी असलेली ही ग्रहस्थिती ही खरेतर त्या दिनी जन्मलेल्या जातकाच्या आयुष्याला ’साक्ष’ देणारी ग्रहस्थिती आहे असे वर्णन नाडिग्रंथांतून येते, तर हीच तुमची पत्रिका होय असे प्रचलित भाषेमध्ये त्या जातकास सांगितले जाते. साध्या भाषेत सांगावयाचे झाल्यास, "तुमचा जन्म ६ जून १९७९ चा आहे" एवढेच जातकास सांगितले जाते. असो. आतां येथून पुढे वाचकांच्या अभ्यासार्थ संक्षेपामध्ये दोन श्लोक देतो आहे. उपरोक्त श्लोकाच्या विवेचनामध्ये दिलेल्या माहितीवरून वाचक स्वत: प्रयत्न करून पुढील श्लोकांची पडताळणी करू शकतील, आणि तशी त्यांनी स्वत: श्लोकांची पडताळणी करून पहावी ही अपेक्षा आहे.

दोन जुळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी एकेकट्याने जावून नाडिग्रंथावलोकन केले होते. त्यांच्या पट्टींमध्ये त्यांच्या जुळेपणाबद्दल उल्लेख येतांना काय प्रकारची शब्दयोजना केली जाते, हे बघूया. त्यापैकी लहान असलेल्या भावंडाच्या वहीमध्ये खालीलप्रमाणे श्लोक येतो:


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


சித்தார்த்தியிலே கடைதிங்கள் தசமோடொன்று
அறியமதி நாள்தானே ஆதிரைமீனும்
வாதிரைமீனும் மதியாழில் சிகிமால்கலசம்
கலசம்மேல் ரவிமீனில் சுங்கன்வருடை
கூறாத மற்றகோட்கள் வேங்கையில்காணும்
सित्तार्त्तियिले कडैतिङ्गळ् तसमोडॊऩ्ऱु
अऱियमदि नाळ्दाऩे आदिरैमीऩुम्
वादिरैमीनुम् मदियाळिल् सिहिमालकलसम्
कलसम्मेल् रविमीनिल् सुङ्गऩ्वरुडै
कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्


या व्यक्तीचा जन्म - सिद्धार्थी नामक संवत्सरात (१९७९-८० मध्ये) शेवटच्या (कडै) म्हणजे फाल्गुन महिन्यात, तमिळ पंचांगाप्रमाणे (तसमोडॊऩ्ऱु) ११ व्या तिथिवर सोमवारी (अऱियमदिनाळ्) झाला. पुढे ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्र (वादिरैमीनुम्), चंद्र मिथुनेत, (मदियाळिल्) केतु आणि बुध कुंभेत (सिहिमालकलसम्), कुंभेच्या पुढे मीनेत रवी (कलसम्मेल् रविमीनिल्), शुक्र मेषेत (सुङ्गऩ्वरुडै), न सांगितलेले इतर सारे ग्रह सिंहेत (कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्) - म्हणजे राहु, शनि, गुरु, मंगळ अशाप्रकारची शब्दयोजना आहे. साध्या भाषेत, या व्यक्तीचा जन्म २४ मार्च १९८० चा आहे असा अर्थ निघतो. ह्या व्यक्तीने एकट्याने जावून मुंबईमध्ये जुलै २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले होते. त्याहीपूर्वी तिच्या जुळ्या भावंडाने एकट्याने दिल्लीमध्ये मार्च २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले, त्यातील जन्मविषयक माहिती देणारा श्लोक खालीलप्रमाणे:


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


யிவளுதிக்க சித்தார்த்தி பங்குனித்திங்கள்
வரும்திகதி யிலாபமதே சோமன்வாரம்
வாதிரைமீனில் மதிதண்டில் சிகிமால்கூனில்
கூனின்மேல் யிரவிமச்சம் சுங்கன்வருடை
கூடியிருக்க மற்றகோள் வேங்கைதன்னில்
यिवळुदिक्क सित्तार्त्ति पङ्गुऩित्तिङ्गळ्
वरुम्तिगदि यिलाबमदे सोमऩ्वारम्
वादिरैमीऩिल् मदिदण्डिल् सिहिमाल्गूऩिल्
कूऩिऩ्मेल् यिरविमच्चम् सुङ्गऩ्वरुडै
कूडियिरुक्क मऱ्ऱकोळ् वेङ्गैतऩ्ऩिल्

ह्याही व्यक्तीचा जन्म, २४ मार्च १९८० लाच झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ह्या दोन्हीही व्यक्ती भिन्न असल्या तरी (जुळ्या असल्यामुळे) त्यांच्या श्लोकांतून मांडलेली ग्रहस्थिती एकच होय. सर्वसाधारणत: महाराष्ट्रीय अथवा दाक्षिणात्य पद्धतीने ह्या व्यक्तींची कुंडली मांडली असतां ग्रहस्थिती एकच असल्याने दृक् रूप कुंडली एकसारखीच दिसावी. (चूकभूल देणेघेणे - मी ज्योतिषाभ्यासक नाही!) तर दोन वेगवेगळ्या ह्या पट्टीतील व्यक्तींच्या बाबतीत येणा-या एकाच ग्रहस्थितीबद्दल शब्दयोजना ही भिन्न भिन्न पद्धतीने समोर येते. जन्ममहिन्याच्या बाबतीत एके ठिकाणी ’फाल्गुन’ (पङ्गुनि) असा उल्लेख असून दुसरे ठिकाणी शेवटचा महिना (कडैत्तिङ्गळ्) अशा शब्दरचनेने तोच महिना दर्शवला आहे. त्याचप्रमाणे जन्मतिथीही दोन वेगळ्या शब्दांनी (यिलाबम् तथा तसमोडॊऩ्ऱु; दोन्हीचा अर्थ ११) दर्शविली आहे. पुढे जन्मवारही दोन वेगळ्या शब्दांनी (अऱियमदिनाळ् तथा सोमन्वारम्) दर्शविला गेला आहे.

श्लोकांमध्ये ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्रासाठी दोन्हीही ठिकाणी एकच शब्द उपयोजिला आहे (आदिरैमीऩ). चंद्र मिथुन राशीत असल्याची स्थिती दोन्हीकडे वेगवेगळ्या शब्दांनी दर्शविली आहे (मदिदण्डिल् आणि मदियाळिल्). केतु आणि बुध कुंभ राशीत असे सांगतांना एके ठिकाणी ’सिहिमाल्गूऩिल्’ अशी शब्दयोजना आहे, तर दुसरे ठिकाणी ’सिहिमालकलसम्’ असे म्हटल्या गेले आहे. रवी मीन राशीत म्हणण्यासाठी दोन्हीकडे ’यिरविमच्चम्’ आणि ’रविमीनिल्’ अशी वेगवेगळी शब्दयोजना आहे तर शुक्र मेष राशीत असे सांगण्यासाठी मात्र दोन्हीकडे ’सुङ्गऩ्वरुडै’ असे म्हटले आहे. दोन्ही श्लोकांतील साम्यवैशिष्ट्य ते असे की दोन्ही श्लोकांमध्ये राहु, शनि, गुरु, मंगळ ह्या ग्रहांचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. दोन्हीही व्यक्तींच्या वहीमध्ये हा जातक जुळ्या भावंडांपैकी एक आहे असा उल्लेख नंतरच्या वर्णनातून केला जातो. त्यातही मोठे कोण, लहान कोण इत्यादि उल्लेख बारकाईने नोंदलेला आढळतो. जिच्या वहीमध्ये ’ही धाकटी आहे’ असा उल्लेख आहे, त्या व्यक्तीने स्वत:च्या मातोश्रींस विचारून घेवून खात्री करून घेतल्यानंतर आधीच्या व्यक्तीच्या जन्मानंतर ११ मिनिटांनी आपला जन्म झाला असल्याचे लक्षात आल्याचे कळवले आहे. असो.

माझ्या माहितीतील, राजकीय वर्तुळातील भारदस्त अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या वहीमध्ये खालील श्लोक येतो


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत
இவளாண்டு ஹேவிளம்பி பங்குனியதில்
இருபானார் திகதியுடன் சேயின்வாரம்
ஆவிசாபம் கரிவருமே சேய்மகரம்
மகரமீரதில் சுங்கனும் ரவிசேவில்
மால்ஞானி மேடம் அரவேந்தன்துளை
ஆகபின் சந்திரனும் தேளதுவில்
इवळाण्डु हेविळम्बि पङ्गुऩियदिल्
इरुबाऩार् तिगदियुडऩ् चेयिऩ्वारम्
आविसाबम् करिवरुमे सेयमहरम्
मगरमीरदिल् सुङ्गऩुम् रविसेविल्
माल्ञाऩि मेडम् अरवेन्दऩ्दुळै
आहपिऩ् सन्दिरऩुम् तेळदुविल्

हेविळम्बि संवत्सर, फाल्गुनमास, २६वी तिथी, मंगळवार, धनुलग्नी शनि, मंगळ मकरेत, शुक्र कुंभेत, रवी मीनेत, बुध+केतु मेषेत, राहू+गुरु तुळेत, चंद्र वृश्चिकेत. साध्या भाषेत ०८ एप्रिल १९५८.

नाडिग्रंथसाहित्यातून खरोखरीच व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद येते काय असे विचारणा-या अभ्यासकांसाठी वरील विवेचनाची झलक प्रेरणादायी ठरावे असे वाटते. गेल्या वर्षभरात सुमार शेकड्याने वह्या आणि ग्रंथपट्ट्या माझ्या नजरेखालून गेल्या असाव्यात, जागाभयास्तव त्या सा-यांतील केवळ ४च श्लोक येथे प्रातिनिधीक म्हणून दिले आहेत. अर्थात, केवळ ४ श्लोकांमध्ये संपणारा हा विषय खचितच नव्हे. खरेतर ह्यामध्ये अजूनही केवढेतरी लिहावयाचे उर्वरित आहे. मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी. बाजारांत मिळणारी तमिळभाषाशास्त्रविषयक शब्दकोश तथा पुस्तके ह्यासाठी नक्कीच उपयोगांत आणतां येतील.

जातां जातां, फलज्योतिषाभ्यासकांसाठी मजजवळ एक प्रश्न आहे. पारंपारिक पद्धतीने कुंडली मांडतांना जन्मवेळेसह जन्मठिकाणाची आवश्यकता असते असे फलज्योतिषाभ्यासक लिहून ठेवतांत. नाडिग्रंथांवरील माझ्या आतांपर्यंतच्या अभ्यासामध्ये कोणाच्याही नाडिग्रंथपट्टीमध्ये जन्मवेळ आणि जन्मठिकाण नोंदविलेले आढळलेले नाही. असे असूनदेखील ’जन्मविषयक इतर माहिती अत्यंत अचूकरीत्या नोंदविली जाते’ असा दावा नाडिग्रंथप्रेमी आणि नाडिवाचकांकडून केला जातो. हे कसेकाय शक्य होते ह्या विषयावर ज्योतिषशास्त्राभ्यासकांनी विचार करावा, चिकित्सकांनी चिकित्सा करावी. असो.

एकुणात काय, तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयातील चमत्कृती आणि दाव्यांस बाजूस ठेवून तीमागील मीमांसा सर्वांगाने अभ्यासिली जाण्यास हवी; जेणेकरून वास्तवाचा अभ्यास होवून सत्यता काय आहे हे आपोआप स्पष्ट होईल. ह्याने अनेक अनुत्तरीत गूढ अशा प्रश्नांची उकलही होईल आणि दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.

------

लेखक: हैयो हैयैयो, मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांहून अधिक काळ अभ्यास. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर मराठी, तमिळ, इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक.

संपर्क: haiyohaiyaiyo@gmail.com

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: