पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म
लेखक
– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –
9902002585
वेदान्त
विवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.
हे पुस्तक पुर्वी
विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळे
असले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञान म्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक
विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतः सत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे
म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी उपनिषदातून फार
पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीत असूनही भौतिक विज्ञानाने त्याचे
ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने का होईना) होते, म्हणून भौतिक जगाचा
वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातून प्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा
संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देतात.
या सुसंगत संकलनात
लेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतन
थक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना
गीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय ‘स्ववैशिष्ठ्यवादी’ म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचा
खरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.
चार्वाकवादावर लेखन
करताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथे
अग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्ध
होते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झाला
आहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.
चार्वाकांचा
देहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतील
यंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेक
उदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्या
कसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठी
जगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,
विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय?
शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून
निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
प्रकरण 2 मधे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी
प्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिक
नसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणे
आवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात ‘परस्पर
विरोध’ (पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात ‘सदसद्विलक्षण’ रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.
प्रकरण 3 मधे ‘जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला न सुटलेले कोडे’
यात ते म्हणतात, ‘जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तर
माहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हे
तर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे.
मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचा
प्रयत्न करताना दिसतात.’ तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून
दिले आहे.
प्रकरण 4 ‘प्लँचेट’ या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे
नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनी त्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट
करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे
आहे. ते म्हणतात की मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.
प्रकरण 5
ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय?
यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भाग म्हणून मान्य
आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. ‘फलज्योतिष
हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य असते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच
भविष्य असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता
नाडीग्रंथाला मुळीच नाही, कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी
यावरून असा निश्कर्ष काढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म
घेणारी व्यक्ती म्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित
होत असतात. म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा
परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पण
समस्याही राहात नाही.
प्रकरण 6 संतसाहित्यातून
अंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे? यावर प्रकाश
पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरील असून ते
बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असे त्यांनी विविध
संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे निर्मित
संताच्या ‘चमत्कारवादातील’ भ्रामक
कथनातून त्यांनी वाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली
आहे. ‘संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांना चमत्कार करता
येतात’ हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य
अद्वयानंद गळतगे त्यांनी, ‘संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून
नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तर
योगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.
प्रकरणे 7 ते 10 मधून
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना ‘समस्या’ ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील ‘विश्वोपत्तीच्या’ निरुपणावर
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाश टाकला आहे. तर प्रकरण
8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही) ‘न करता भजन जाहले’ म्हटले आहे,
त्याचा मतितार्थ कसा लावावा किंवा कसा लावू नये?
याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक कर्म
परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो ‘जाणतो’ किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारण
त्याच्या त्या ‘जाणण्यामुळे’
ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जो जाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून
हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजन घडत नाही’.
प्रकरण 9 मधे ‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता
नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील
लाडवा प्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?,
गीता कथनाला युद्धभूमि योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?
आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिक फोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे ‘गीतेचे अधिकारी कोण? असा नेहमी विचारला
जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देताना प्राचार्य अद्वयानंद
गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, ‘तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईल
सुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारी
आहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे?
तर- वधूची आई वरात श्रीमंती पहाते, बाप
वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्न पाहून खुष
होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला ‘वर’ म्हणून निवडते,
पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचा सोबती’
म्हणून निवडते. म्हणून तिचा एकटीचाच वरावर ‘अधिकार
चालतो’. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या
अधिकारी व्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार)
म्हणून निवडाची असते.
प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. ‘अष्टावक्र
गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा
जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या
योग्याने केलेला उपदेश व श्री कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना, केवल
वेदांतातील ‘दृष्टीसृष्टीवाद’
तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिक
दृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्य
विचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्य
अद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व ‘स्वानुभवविश्वाचे
माणिक-मौत्तिकांचे आगर’ आहेत असे जाणवते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा