ग्रंथपरिचय –निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक
भानामतीचे खेळ कोण करते? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का ? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो ? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतिक शास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत? विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तानवनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित ते घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे, अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.
जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा आंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणार्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.
पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात, परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.
लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२३८३९९ वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा