चिकित्सेच्या दृष्टिकोनातून.
प्रेषक हैयो हैयैयो (बुध, 09/02/2009 - 05:42)
चिकित्सेच्या दृष्टिकोनातून.
श्री. घाटपांडे सर,
आपले प्रश्न रास्त आहेत, परंतु काही लिहिणेपूर्वी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपणांस ह्या प्रश्नांची उत्तरे सिद्ध ('रेडिमेड्') हवी आहेत काय? चिकित्सकाच्या दृष्टीने पाहू जाता अशी सिद्ध उत्तरे चिकित्सेस योग्य असतात काय? दुसर्याने दिलेल्या उत्तरांवर विसंबून अशी चिकित्सापूर्ति होते काय? पुन्हा, एखाद्याने दिलेल्या उत्तरांवर आपला विश्वास बसेल की न बसेल हे कसे सांगणार? न्यायशास्त्राच्या नियमांनुसार पहावयाचे झाल्यास, एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आपणांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे आपले उत्तरदायित्त्व ठरते. 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर ती मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार?
आपण आपल्या लेखात नाडिशास्त्र हा शुद्ध भंपकपणा आहे असे मांडले आहे खरे, परंतु आपल्याच लेखात अनेक मुद्दे अस्पष्ट आहेत. उदा:
- लेखाच्या आरंभीच आपण "आम्ही नाडीज्योतिषाकडे विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही" असे म्हणता, परंतु नाडिवाचकाला उत्तर का देता येत नाही ह्याची कारणे आपण शोधली काय हे कळत नाही. एखाद्या नाडिवाचकास एका विशिष्ट वेळी आपल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर इतर कोणाही नाडिवाचकास त्या विचारणेचे उत्तर कधीच देता येणार नाही असे आम्हाला वाटत नाही. पुढे आपण ह्याबाबतीत इतर काही शोध घेतला का हे कळावयास मार्ग नाही.
- "नाडिवाचक पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो" असे आपण म्हणता, परंतु त्या पट्टीवर खरोखरीच काही लिहिले असते काय, लेखन केले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते, त्या भाषेस काही व्याकरण आहे काय, व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा; लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय, ह्या अशा साध्या प्रश्नांचा आपण स्वतः काही शोध घेतला का हे कळावयास मार्ग नाही. तसेच इतर कुणाचे सहाय्य घेऊन तरी आपण ह्या आणि अशा प्रश्नांचा शोध घेतला काय हेही कळावयास मार्ग नाही. आणि तरीही आपण "नाडिवाचक पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो" असे म्हणत असाल तर एखाद्याने आपले म्हणणे काय म्हणून मान्य करावे?
- कूटतमिळलिपीचा अडथळा येतो तेंव्हा आपण मराठी लोकांना काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते असे म्हणून चक्कन् मोकळे होता. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता एका चिकित्सकाने असे हतबलतापूर्ण प्रतिपादन करणे योग्य वाटत नाही. वास्तविक पाहता आपणांस देवनागरीइतकी शास्त्रशुद्ध लिपी येते, तेंव्हा आपणांस कूटतमिळलिपी येण्यास काहीच प्रत्यवाय नाही. आपण कूटतमिळलिपी अथवा तमिळलिपी शिकावयाचा प्रयत्न केलात काय हे कळावयास मार्ग नाही. आपणांस स्वतःस एवढे कष्ट नको असल्यास, कूटतमिळलिपी जाणणार्या - जे आपल्या कार्यास हातभार लावू शकतात अशा लोकांचा शोध आपण घेतला काय हेही कळावयास मार्ग नाही.
नाडिशास्त्रावरील आपले सिद्धांत कसे एकांगी आहेत हे एवढ्यावरूनच कळावे. ह्यापुढील संपूर्ण लेख हा अशा ठिसूळ पायावर आधारलेला असल्यामुळे मी विचारात घेत नाही.
असो. एक फलज्योतिषचिकित्सक तथा अभ्यासक ह्या नात्याने नाडिज्योतिष हा विषय आपल्याला वर्ज्य नाही आणि आपण अनेक प्रश्न अनुत्तरित असूनदेखील आपण चिकित्सेसाठी खुले आहात हा आपला मोठेपणाच मानावा लागेल. तरी मी पूर्वी सुचविल्याप्रमाणे आपण अथवा आपल्यासारखे विचार असणारे इतर जे त्यांच्याकडून नाडिशास्त्राच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करण्यात यावी आणि तिचा अहवाल सादर करण्यात यावा. आपण स्वत: अथवा आपल्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल.
शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा